How To Get Vaibhav Sooryavanshi Wicket: आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा अंडर -१९ क्रिकेट, एकच नाव सध्या तुफान चर्चेत आहे ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. १५ वर्षांचा डावखुरा स्फोटक फलंदाज. ज्या वयात मुलं दहावीची परीक्षा देतात, त्याच वयात हा पठ्ठ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेल्या गोलंदाजांची परीक्षा घेत आहे. जसप्रीत बुमराह, राशिद खान किंवा मग मोहम्मद सिराज, हे असे गोलंदाज आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवला आहे. पहिल्या चेंडूवर स्वप्न पाहणाऱ्या वैभवने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात केली होती. आता त्याने नंबर १ गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील असा एकमेव गोलंदाज असावा, ज्याचे फलंदाज ४ ओव्हर्स खेळून काढतात. त्यानंतर उरलेल्या गोलंदाजांवर हल्ला चढवतात. पण वैभवने असं काहीच केलं नाही. वैभवने बुमराहच्या पहिल्याच षटकात २ खणखणीत षटकार खेचले. शार्दुल ठाकूरच्या षटकातही त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून दमदार सुरुवात केली. पण याच षटकात तो झेलबाद होऊन माघारी परतला. ज्या पद्धतीने तो झेल बाद झाला, त्यावरून त्याला लवकरात बाद कसं करायचं, याची तोड मिळाली आहे.

वैभवला आऊट कसं करायचं?

कुठल्याही फलंदाजाला बाद करण्याआधी त्याची मजबुत बाजू कमकुवत बाजू माहीत असायला हवी. वैभव मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. तो ड्राईव्ह, स्वीप किंवा मग कट असे पारंपरिक क्रिकेटचे फटके खूप कमी मारतो. तो जोरात बॅट फिरवून चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्यावर अधिक भर देतो. त्यामुळे तो झेल बाद होण्याची शक्यता अधिक आहे. ज्या चेंडूवर इतर फलंदाज कट शॉट मारतात, तोच चेंडू वैभव पॉईंटच्या वरून षटकारासाठी पाठवतो. कव्हर ड्राईव्हऐवजी तो लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह मारण्यावर अधिक भर देतो. त्यामुळे गोलंदाजांनी त्याच्या फलंदाजीचा नीट अभ्यास केला तर त्याला लवकरात लवकर बाद करता येऊ शकतं.

आयपीएल २०२६ स्पर्धेत तो ३ वेळा फलंदाजीला आला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध खेळताना त्याने १७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली होती. या सामन्यात अंशूल कंबोजने त्याला ऑफ साईडच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. ऑफ साइडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो डीप कव्हरला सर्फराज खानच्या हातून झेलबाद झाला होता.

दुसऱ्या सामन्यात राशिद खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला होता. आता तिसऱ्या सामन्यात त्याला शार्दुल ठाकूरने बाद करत माघारी धाडलं. शार्दुलने ओव्हर द विकेटचा मारा करत ऑफ साइडच्या बाहेर जाणारा आणि वैभवच्या शरीरापासून दूर असलेला चेंडू टाकला. या चेंडूवर वैभवने जागा बनवून कव्हर्सच्या वरून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो पुन्हा एकदा झेलबाद होऊन माघारी परतला.

सिंपल प्लॅन

वैभवच्या शरीरापासून दूर गोलंदाजी करायची, जेणेकरून तो लांबून फटका मारेल. कारण तो चेंडूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत नाही. गोलंदाजीत विविधता असणं गरजेचं आहे. कारण जितक्या जोरात चेंडू टाकणार तितक्याच जोरात चेंडू मैदानाबाहेर जाईल. कारण त्याची बॅट स्विंग खूप चांगली आहे. ऑफ साइडच्या बाहेर चेंडू टाकल्यास तो एक्स्ट्रा कव्हरच्या हातून झेलबाद होण्याची शक्यता अधिक आहे. यासह फिरकी गोलंदाजांनी त्याच्या शरीरापासून दूर चेंडू टाकून, त्याला स्टेप आऊट करण्यासाठी भाग पाडावं, अशावेळी तो यष्टीचीत होण्याची शक्यता अधिक आहे.