दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी अतिशय चुरशीच्या मुकाबल्यात गुजरातने अवघ्या एका धावेच्या फरकाने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. हाताला दुखापत झालेली असतानाही मैदानात परतलेल्या दिल्लीच्या डेव्हिड मिलरने विजयासाठी जीवापाड प्रयत्न केले मात्र ते अपुरे ठरले. शेवटच्या चेंडूवर दिल्लीला दोन धावांची आवश्यकता होती. दिल्लीला हे आव्हान झेपलं नाही. शेवटचा चेंडू वाईड आहे की नाही याचा फैसला तिसऱ्या पंचांनी केला. चेंडू वाईड नसल्याचं स्पष्ट होताच गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. वाईड आहे की नाही हे ठरवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचं साहाय्य घेण्यात आलं. काय आहे हे तंत्रज्ञान समजून घेऊया.

शेवटच्या षटकात काय परिस्थिती होती?

१९व्या षटकात मिलरच्या फटकेबाजीच्या बळावर दिल्लीने २३ धावा लुटल्या होत्या. यामुळे शेवटच्या षटकात दिल्लीला ६ चेंडूत १३ धावा असं आव्हान होतं. षटकांची गती न राखल्याबद्दल पंचांनी गुजरात संघावर कारवाई केली. शेवटच्या षटकात गुजरातचे चारच क्षेत्ररक्षक ३० गज वर्तुळाच्या बाहेर होते. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विपराज निगमने चौकार मारला. मात्र दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारायचा त्याचा प्रयत्न शुबमन गिलच्या अफलातून झेलमुळे संपुष्टात आला. तिसऱ्या चेंडूवर कुलदीप यादवने एकेरी धाव घेतली. चौथ्या चेंडूवर डेव्हिड मिलरने उत्तुंग षटकार खेचत सामन्याचं पारडं दिल्लीच्या बाजूने झुकवलं. पाचव्या चेंडूवर मिलरने चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने टोलवला. कुलदीपने पळायला सुरुवात केली मात्र मिलरने एकेरी धाव नाकारली. यामुळे शेवटच्या चेंडूवर दिल्लीला दोन धावांची आवश्यकता होती. प्रसिधने शेवटचा चेंडू स्लोअरवन टाकला. मिलरचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसला आणि चेंडू यष्टीरक्षक जोस बटलरकडे गेला. बटलरने झटपट चेंडू टिपत स्टंप्सच्या दिशेने मारला. चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला त्यावेळी कुलदीप क्रीझच्या बाहेर होता. वाईडचा कौल देण्यात आला असता तर सामना बरोबरीत संपला असता. निकालासाठी सुपर ओव्हर झाली असती. मात्र तसं झालं नाही. शेवटचा चेंडू उंचीच्या दृष्टीने वाईड होता की नाही याबाबत मैदानावरील पंचांनी कौल दिला होता. तिसऱ्या पंचांनी तंत्रज्ञानाच्या आधारे चेंडू वाईड नसल्याचं सांगितलं आणि गुजरातने विजय मिळवला.

हाईट वाईडचा निर्णय कसा घेतात?

ओव्हर द हेड वाईड म्हणजे उंचीच्या दृष्टीने वाईड ठरेल अशा परिस्थितीत बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येईल असं आयपीएल प्रशासनाने ठरवलं. २०२४ आयपीएल हंगामात हाईट नो ठरवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. हॉक आय यंत्रणेचा भाग असलेलं बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञान, पॉपिंग क्रीझमध्ये फलंदाज खेळत असताना चेंडूची उंची मोजतं. ही उंची आणि खेळाडूची उंची समोरासमोर मांडलं जातं. खेळाडूंची उंची डेटाबेसमध्ये आधीच नोंदलेली असते. जो फलंदाज चेंडू खेळला त्याची उंची आणि चेंडूची उंची मापली जाते. चेंडूची उंची फलंदाजाच्या डोक्यापेक्षा उंचीवर असेल तर वाईडचा कौल दिला जातो. खेळाडूच्या उंचीसंदर्भात आयत्या क्षणी निर्णय घेतला जात नाही कारण डेटाबेसमध्ये ही माहिती आधीच देण्यात आलेली असते. मिलरच्या संदर्भात चेंडू त्याच्या डोक्यापेक्षा जास्त उंचावर नसल्यामुळे वाईड देण्यात आला नाही. तिसऱ्या पंचांनी निर्णय घेतला तेव्हा मिलरच्या डोक्याची उंची १.८७ मीटर होती. खांद्याची उंची १.५७ मीटर होती. चेंडू १.७५ मीटर उंचीवरून गेला. याक्षणी मिलरचे पाय हवेत होते हेही पंचांनी टिपलं आणि चेंडू वैध असल्याचं सांगितलं.

वाईड गाईडलाईन तंत्रज्ञान

चेंडू वाईड द्यायचा की नाही यासंदर्भात संदिग्धता नसावी याकरता आयपीएल प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं साहाय्य घेण्याचं ठरवलं. कारण यावरून अनेकदा वाद होतात. उजव्या हाताने फलंदाजी करणारा खेळाडू ऑफस्टंपच्या उजवीकडे सरकला तर वाईड गाईडलाईन त्यानुसार अंतर मोजेल आणि त्याची माहिती पंचांना देण्यात येईल. हॉक आय टेक्नॉलॉजीद्वारे फलंदाज उजवीकडे किंवा डावीकडे किती पुढे सरकला आहे याची माहिती संगणकाच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांना देण्यात येईल. वाईड गाईडलाईन नक्की कुठे आहे याचीही माहिती पुरवण्यात येईल. तिसरे पंच दोन्ही तपासून निर्णय देतील.

या नियमाचं कधी ठरलं?

ऑफस्टंपबाहेरील वाईड आणि हाईट वाईड यासंदर्भात हॉक आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फैसला दिला जाईल असा निर्णय आयपीएल प्रशासनाच्या २० मार्च रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. २२ मार्च रोजी मुंबईत सर्व कर्णधारांची बैठक झाली. त्यामध्ये यासंदर्भात सर्व कर्णधारांना सूचित करण्यात आलं. नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारण्यात आघाडीवर असलेल्या आयपीएल प्रशासनाने २०२३ वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत पहिल्यांदा याची चाचणी घेतली होती. संघांना नोबॉल आणि वाईडच्या निर्णयाबाबत डीआरएस घेण्याची परवानगी देण्यात आली होती. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये हाईट नोबॉल संदर्भात बॉल ट्रॅकिंगचा वापर करण्यात आला. यासाठी ‘द स्मार्ट रिप्ले सिस्टम’ अवलंबण्यात आली आहे.

वाईड नसल्यामुळे काय झालं?

शेवटचा चेंडू वाईड नसून वैध असल्यामुळे गुजरातच्या हंगामातल्या पहिल्यावहिल्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. गुजरातला दोन गुण मिळाले. दुसरीकडे विजयाच्या उंबरठ्यावर दिल्लीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. वाईड देण्यात आला असता तर सामना बरोबरीत सुटला असता. सुपर ओव्हरद्वारे फैसला झाला असता. दिल्लीला जिंकण्याची नव्याने संधी मिळाली असती पण तसं झालं नाही.

सामन्यात काय घडलं?

दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरातने कर्णधार शुबमन गिल (७०), जोस बटलर (५२) आणि वॉशिंग्टन सुंदर (५५) यांच्या अर्धशतकांच्या बळावर २१० धावांचा डोंगर उभारला. दिल्लीने के.एल.राहुलच्या ९२ धावांच्या खेळीच्या बळावर विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. हाताला दुखापत झाल्यामुळे उपचारांसाठी ड्रेसिंगरुमध्ये परतलेल्या मिलरने २० चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४१ धावांची खेळी केली मात्र ती अपुरी ठरली. दिल्लीने २०९ धावा केल्या. ३ विकेट्स पटकावणाऱ्या रशीदला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.