स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सचे खेळाडू अडकल्याचा धक्का पचवण्यापूर्वी पुन्हा एकदा जोरदार धक्का राजस्थान संघाबरोबरच क्रिकेट विश्वालाही बसला आहे. राजस्थानचा सहमालक राज कुंद्रा याने सट्टेबाजी केल्याची कबुली दिल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून हे वृत्त ऐकून धक्का बसल्याचे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी व्यक्त केले आहे.
‘‘संघाचे मालक असून सट्टेबाजी करणे हे अनैतिक आहे. या गोष्टी क्रिकेटबरोबरच आयपीएलसाठी चांगल्या नाहीत. क्रिकेट चाहत्यांचा विश्वासघात केल्याचे हे अजून एक प्रकरण सर्वापुढे आले आहे. ही घटना धक्कादायकच आहे,’’ असे जगदाळे यांनी सांगितले.
कुंद्राने सट्टेबाजी केल्याचे निष्पन्न झाले तर राजस्थान रॉयल्स संघावर बंदी घालण्यात यावी का, असे विचारल्यावर जगदाळे म्हणाले की, ‘‘कायदेविषयक बाबींवर मी टिप्पणी करणार नाही. पण हा निर्णय घेण्याचा अधिकार आयपीएल प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीला आहे. या साऱ्या प्रकरणांमधून बीसीसीआयने धडा घ्यायला हवा. लवकरच यामधून चांगला मार्ग निघेल. सर्वानी एकत्रितपणे बसून क्रिकेट आणि व्यवस्था अधिकाधिक स्वच्छ कशी करता येईल, याला प्राधान्य द्यायला हवे. बीसीसीआयमध्ये निर्णय घेण्यायोग्य माणसे आहेत आणि ते लवकर याबाबतीत निर्णय घेतील, कुणी पदाचा वापर करून एकमुखी निर्णय घेऊ नये.’’
बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘‘कुंद्रासारख्या उद्योगपतीने सट्टेबाजी करणे हा मूर्खपणा आहे. जोपर्यंत भारतात सट्टेबाजी कायदेशीररीत्या अवैध आहे तोपर्यंत हा एक गुन्हा आहे. कुंद्रा हा राजस्थानच्या संघाचा मालक आहे, त्याच्याकडे एवढे पैसे असताना त्याला सट्टेबाजी करण्याची काय गरज होती? परंतु चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघातील कुणी सट्टेबाजीत सापडले तर या संघांना स्पर्धेतून हद्दपार करावे.
कुंद्राच्या कबुलीने धक्का बसला! -जगदाळे
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सचे खेळाडू अडकल्याचा धक्का पचवण्यापूर्वी पुन्हा एकदा जोरदार धक्का राजस्थान संघाबरोबरच क्रिकेट विश्वालाही बसला आहे. राजस्थानचा सहमालक राज कुंद्रा याने सट्टेबाजी केल्याची कबुली दिल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून हे वृत्त ऐकून धक्का बसल्याचे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी व्यक्त केले आहे.
First published on: 07-06-2013 at 12:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am shocked at raj kundras betting admission says sanjay jagdale