‘मला कोणाचाही आधार नाही. माझं जे काही आहे ते माझे बाबाच आहेत. ते सोडून कुणीच माझ्या पाठीशी उभं राहिलेलं नाही. मी मेहनतीवर विश्वास ठेवतो. भारतासाठी खेळायचं हे बाबांचं स्वप्न होतं ते मी पूर्ण केलं याचा अभिमान आहे. आमच्या पिढीत भारतासाठी खेळणं सोपं नाही. प्रचंड स्पर्धा आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांच्या राशी ओतल्या. कठोर मेहनतीला मिळालेलं फळ आहे. मला क्रिकेट खेळायला आवडतं, तीच माझी प्रेरणा आहे’, असं सर्फराझ खानने म्हटलं आहे. क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सर्फराझने आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबई-रेल्वे यांच्यातील रणजी करंडक लढतीदरम्यान सर्फराझने आपलं म्हणणं मांडलं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अचंबित करणारी आकडेवारी नावावर असूनही सर्फराझचा टेस्ट टीमसाठी विचार होत नाही. त्या पार्श्वभूमीवर तो बोलत होता.
‘मला घरी बसायला आवडत नाही. मला संधी मिळते तेव्हा खेळतो- रणजी ट्रॉफी, मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, आयपीएल- कोणताही स्पर्धा असो. भारतीय संघात निवड झाली, तिथे १०० टक्के देईन. भारत अ संघात निवड झाली- तिथेही सर्वस्व देऊन खेळेन. मला क्रिकेट खेळायचं आहे’, असं त्याने सांगितलं.
सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि वजन कमी केलं
भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर सर्फराझने मोठ्या प्रमाणात वजन कमी केलं. ९७ वरून आता त्याचं वजन ७७ किलोवर आलं आहे. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतले फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. यासंदर्भात सर्फराझला विचारलं असता तो म्हणाला, ‘कोणीही वजन कमी कर असं सांगितलं नाही. सोशल मीडियावर माझ्याबद्दल जे बोललं गेलं ते पाहिलं. माझं वजन जास्त होतं, त्यात शंकाच नाही. मी कामाला लागलो. याचा मला खेळताना उपयोगच होईल’.
भारतीय संघ जाहीर होतो तेव्हा मला अपेक्षा असते
‘जेव्हाही भारतीय संघाची निवड होती, त्यात माझं नाव असेल अशी अपेक्षा असते. पण निवड झाली नाही तर मी नाऊमेद न होता सरावाला लागतो. न्यूझीलंड दौऱ्यासाठी सर्फराझची भारत अ संघात निवड झाली नाही. भारतासाठी खेळून सर्फराझला दोन वर्ष झाली आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत साई सुदर्शन दुखापतग्रस्त झाल्याने सर्फराझची निवड झाली पण त्याला अंतिम अकरात खेळवण्यात आलं नाही. निवडसमितीने मला स्पष्ट सांगितलं नसलं तर भारतीय उपखंडातल्या खेळपट्ट्यांसाठी माझा प्राधान्याने विचार होईल असं सूचित करण्यात आलं’.
‘मी दक्षिण आफ्रिकेत अ संघासाठी खेळलो, धावा केल्या. इंग्लंडमध्ये गेलो, तिथेही धावा केल्या. परदेशात खेळल्यानंतर अचानक भारतात येऊन फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळणं सोपं नाही. मी भारताबाहेरही धावा केल्या आहेत. माझी बॅट बोलते. धावा करणं माझं काम आहे, ते मी करत राहीन’, असं सर्फराझ म्हणाला.
२०२४ मध्ये खेळलेल्या शेवटच्या टेस्टमध्ये सर्फराझची कामगिरी ० आणि १ अशी झाली होती. मात्र त्याच मालिकेतल्या पहिल्या टेस्टमध्ये सर्फराझने दीडशतकी खेळी साकारली होती. टेस्ट टीममध्ये पुनरागमन होऊनही सर्फराझची दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाली नव्हती. मात्र इराणी करंडक स्पर्धेतील शेष भारत संघाचं उपकर्णधारपद त्याच्याकडे सोपवण्यात आलं होतं.
सर्फराझ सध्या रणजी करंडक स्पर्धेत मुंबईसाठी खेळतो आहे. १, १५४, ०, ४० आणि ५५ अशी त्याची कामगिरी झाली आहे. ‘रणजी स्पर्धेसाठी मी कसून मेहनत घेतली आहे. मी घरी नसतो. मी आझाद मैदान किंवा क्रॉस मैदानात असतो. प्रत्येकवर्षी नव्याने सुरुवात करणं अवघड आहे पण मला क्रिकेट आवडतं. बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत. अजून काय करता येईल याचा मी विचार करतो’, असं तो म्हणाला.
