Axar Patel on BCCI Rule Ahead of IPL 2026: आयपीएलमधील गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाखाली उत्कृष्ट कामगिरी केली होती. भारतीय स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सलग दुसऱ्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवणार आहे. गेल्या हंगामात दमदार सुरुवात करूनही दिल्लीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नाही. आता, आयपीएल २०२६ मध्ये, कामगिरीत सुधारणा करून संघाला आणखी विजयाकडे नेण्याच्या आशेने कर्णधार उतरणार आहे. पण यापूर्वी अक्षर पटेलने बीसीसीआयच्या निर्णयाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

पण हंगाम सुरू होण्यापूर्वी, दिल्लीच्या कर्णधाराने बीसीसीआयने लागू केलेल्या एका विशिष्ट नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आणि तो नियम त्याला आवडत नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. हा नियम ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा आहे, जो किमान पुढच्या हंगामापर्यंत सुरू राहणार आहे. अक्षर पटेल या नियमाबाबत काय म्हणाला, जाणून घेऊया.

आयपीएलमध्ये गेल्या दोन हंगामांपासून ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा नियम लागू आहे आणि तो या हंगामातही सुरू राहील. या नियमाच्या सुरुवातीपासून, आयपीएलमध्ये मोठ्या धावसंख्या उभारण्यातही मोठी वाढ दिसून आली आहे, तर दुसरीकडे अष्टपैलू खेळाडूंची भूमिका कमी झाली असून, संघ त्यांचा वापरही कमी करत आहेत. लिलावांमध्येही हे स्पष्ट झालं आहे. गेल्या दोन हंगामांपासून हे स्पष्ट दिसतंय की, संघ आता अधिकाधिक फलंदाज किंवा गोलंदाजाला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरवत आहेत. परिणामी, अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी झाले आहे.

अक्षर पटेलने इम्पॅक्ट प्लेअर निर्णयाबाबत व्यक्त केली नाराजी

यामुळे हा नियम सतत प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडला आहे आणि या हंगामात त्यावर चर्चा सुरू झाली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला एका पत्रकार परिषदेत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला याबद्दल विचारण्यात आलं. स्वतः एक स्टार अष्टपैलू खेळाडू असल्याने पटेलने आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “मला हा नियम आवडत नाही कारण मी स्वतः एक अष्टपैलू खेळाडू आहे. पूर्वी अष्टपैलू खेळाडूंची निवड केली जायची, पण या नियमामुळे संघ व्यवस्थापनाला फलंदाज किंवा गोलंदाजाची निवड करणं भाग पडलं आहे.”

अक्षरने पुढे म्हटलं, “मी सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि म्हणूनच मला हा नियम आवडत नाही. जे नियम आपल्या हातात आहेत, ते आपल्याला पाळावेच लागतात, पण वैयक्तिकरित्या मला हा नियम आवडत नाही.” इम्पॅक्ट प्लेयर नियम २०२४ च्या हंगामात लागू करण्यात आला होता.