‘संघाच्या विजयात योगदान देणं महत्त्वाचं आहे. टीकाकारांना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही’, अशा शब्दांत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने आपल्या भावना व्यक्त केल्या. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात रियान ड्रेसिंगरुममध्ये वेपिंग अर्थात ई सिगारेट ओढताना दिसला होता. हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आयपीएल नियमावलीचं हे उल्लंघन होतं. भारतात ई सिगारेटवर बंदी आहे. त्यामुळे रियानला मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागेल अशी शक्यता होती. मात्र नियमातील तरतुदींप्रमाणे रियानला मानधनाच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. राजस्थान रॉयल्स संघावर मोठी कारवाई होऊ शकते.
मुल्लानपूरमधील पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान राजस्थान संघ २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, डावाच्या १६व्या षटकात प्रसारणादरम्यान कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेची चर्चा अधिक वाढण्यामागे वेळही महत्त्वाचा आहे. याच हंगामात परागला त्याच्या फलंदाजी आणि कर्णधारपदाबाबत आधीच टीकेला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे या नव्या घटनेमुळे त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित झालं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पराग दुसऱ्या डावात राजस्थानच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना व्हेपिंग करत असल्याचं दिसतं. प्रसारणादरम्यान टिपलेली ही दृश्यं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आली.
आयपीएल नियमांनुसार, स्टेडियम परिसर आणि ड्रेसिंग रूममध्ये धूम्रपान करण्यास परवानगी नाही, फक्त काही निश्चित केलेल्या जागांमध्येच धुम्रपान करता येतं. याशिवाय, भारतात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा, २०१९ (PECA) अंतर्गत ई-सिगारेट आणि व्हेपवर पूर्ण बंदी आहे. या कायद्यानुसार ई-सिगारेट/व्हेपचे उत्पादन, विक्री, खरेदी, वापर, आयात-निर्यात आणि जाहिरात करण्यास मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये दंड आणि तुरुंगवासाचाही समावेश आहे.
आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्ट लेव्हल १ चे उल्लंघन केल्यामुळे त्याला १ डिमेरिट पॉईंट देखील देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रियान पराग आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२१ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळून आला आहे. हा नियम खेळाची बदनामी किंवा गैरवर्तणूक करण्याशी संबंधित आहे. भारतात ई-सिगारेटवर बंदी आहे. असं असतानाही रियान पराग सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये बसून असे कृत्य करत असेल. तर हे चुकीचं आहे. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी झालेल्या लढतीत, राजस्थान रॉयल्स संघाने जयपूरच्या घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना २२५ धावांची मजल मारली. कर्णधार रियान परागने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत देत ५० चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांसह ९० धावांची खेळी केली. ध्रुव जुरेलने ४० तर डोनाव्हन फरेराने १४ चेंडूत ४७ धावा करत रियानला चांगली साथ दिली. दिल्लीतर्फे यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना खेळणाऱ्या अनुभवी मिचेल स्टार्कने ३ विकेट्स पटकावल्या. स्टार्कने यशस्वी जैस्वालला बाद केलं तर कायले जेमिसनच्या यॉर्करवर वैभव सूर्यवंशी त्रिफळाचीत झाला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाथुम निसांका आणि के.एल.राहुल यांनी ११० धावांची सलामी दिली. निसांकाने ६२ तर राहुलने ७५ धावांची खेळी करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. नितीश राणाने ३३ तर आशुतोष शर्माने २५ धावांची खेळी केली. विजयानंतर बोलातना रियान म्हणाला, ‘२२३ ही चांगली धावसंख्या होती. आम्ही मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. आम्ही चौकार जातील असे चेंडू टाकले. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन अर्थात मॅचअप्सच्या विचारातून जडेजाला फरेराआधी पाठवण्यात आलं. आठ-नऊ षटकं बाकी होती. त्यावर खूप विचार करायला नको. दुखापत फार गंभीर नसावी. मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. आम्हाला आठवडाभराची विश्रांती आहे, त्यामुळे मी त्यातून सावरेन’.
‘आज मोठी खेळी करू शकलो. टीकाकारांना प्रत्युत्तर द्यावं असं मला वाटत नाही. संघाच्या विजयात योगदान देणं आवश्यक आहे. आम्ही हरलो ही वस्तूस्थिती आहे. या पराभवातून शिकू आणि पुढच्या सामन्यात पुनरागन करू’, असं रियान म्हणाला.
