पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटरअब्दुल रझ्झाक आपल्या वादग्रस्त आणि स्फोटक वक्तव्यासाठी ओळखला जातो. आता रझ्झाकने भारत-पााकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांबाबत एक विधान केले आहे. या विधानानंतर रझ्झाक चर्चेत आला आहे. ”भारतीय क्रिकेट संघाचे पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंध नसण्याचे कारण म्हणजे त्यांना माहीत आहे, की भारत हा आमच्यापेक्षा खालच्या दर्जाचा संघ आहे. पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारची गुणवत्ता आहे, ती अतुलनीय आहे. अशी गुणवत्ता भारतीय क्रिकेट संघात नाही”, असे वक्तव्य रझ्झाकने केले.

अब्दुल रझ्झाक एका वृत्तसंस्शेला मुलाखत देताना म्हणाला, “भारत पाकिस्तानशी स्पर्धा करू शकेल असे मला वाटत नाही. पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारची प्रतिभा आहे, ती पूर्णपणे वेगळी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने होत नाहीत, हे क्रिकेटसाठी चांगले नाही. खेळाडूंना ते किती दबाव हाताळू शकतात हे दाखवण्याची संधी होती. पण या दोघांत सामने झाले असते, त्यावरून पाकिस्तानकडे किती गुणवत्ता आहे आणि भारताकडे ती नाहीये, हे कळले असते.”

हेही वाचा – “माझा मुलगा तुझा जावई”, मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटरची मुलगी ब्राव्होला सून म्हणून हवीय घरात; पण…

२४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान आयसीसी टी-२० विश्वचषकात आमनेसामने येतील. इंग्लंडमध्ये २०१९ च्या विश्वचषकानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील.

टीम इंडियाने २००७ पासून टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. दुसरीकडे पाच वेळा वनडे वर्ल्डकप जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. स्पर्धेचा हा सातवा हंगाम असून वेस्ट इंडिज स्पर्धेचा गतविजेता आहे आणि त्याने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड हे देखील प्रत्येकी एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाले आहेत.