‘‘सचिन हा माझ्यासाठी लहानपणापासूनच आदर्श होता. त्याचा खेळ पाहूनच मी लहानाचा मोठा झालो. पण अलीकडेच क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या या महानायकाबरोबर खेळल्याचा अभिमान मला वाटत आहे,’’ अशा शब्दांत इंग्लंडचा फलंदाज इयान बेल याने सचिन तेंडुलकरची स्तुती केली.
बेल म्हणाला, ‘‘मानसिकदृष्टय़ा सचिन सक्षम होता. मी खेळत असताना गेल्या १५ वर्षांत सचिन यशोशिखरावर होता. सचिनला आदर्श मानून आणि त्याचा खेळ पाहून मी विकसित झालो. मैदानावरील वातावरण बदलण्याची क्षमता असलेला तो जगातील एकमेव फलंदाज आहे. मी भारताविरुद्ध भारतात किंवा इंग्लंडमध्ये ज्यावेळी खेळलो, त्यावेळी सचिन मैदानावर फलंदाजीला उतरला की वातावरण बदलून जायचे. असा सचिन पुन्हा होणे नाही.’’
‘‘सचिनचा खेळ पाहतच राहावा, असा होता. यापुढे त्याची उणीव आम्हाला नक्कीच जाणवेल. या महान खेळाडूविरुद्ध खेळल्याचा मला अभिमान आहे,’’ असेही बेलने सांगितले.