‘मला दवाचा राग येतो. दवामुळे सगळी परिस्थिती बदलू शकते’, असं मत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केलं आहे. २००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपचं जेतेपद भारताने धोनीच्याच नेतृत्वात पटकावलं होतं. २०२६ टी२० वर्ल्डकप काही दिवसातच सुरू होत आहे. टीम इंडियाबाबत काय वाटतं यावर धोनीने आपली मतं मांडली. मात्र त्याचवेळी दवाच्या मुद्याकडे त्याने आवर्जून लक्ष वेधलं.
भारतीय संघ झंझावाती फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या टी२० मालिकेत भारताने न्यूझीलंडवर ४-१ असा विजय मिळवला. सलामीवीर अभिषेक शर्मा, कर्णधार सू्र्यकुमार यादव, इशान किशन झंझावाती फॉर्मात आहेत. अष्टपैलू शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या उत्तम खेळत आहेत. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात जेतेपदाची कमाई केली होती. रोहित शर्मा, विराट कोहली या दोघांसह रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन निवृत्त झाले आहेत. मात्र नवी पिढी रोहित-विराटचा वारसा पुढे चालवण्यासाठी सज्ज आहेत अशी ग्वाही त्यांच्या खेळाने दिली आहे.
जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात धोनी बोलत होता. भारतीय संघाबाबत विचारलं असता धोनी म्हणाला, ‘अत्यंत धोकादायक संघांपैकी एक आहे. एका चांगल्या सर्वसमावेशक संघासाठी जे लागतं ते सगळं या संघात आहे. या संघात अनुभवी खेळाडू आहेत. दडपणाखाली खेळण्याचा अनुभव आहे. टी२० प्रकारात खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव असणारे खेळाडू आहेत’.
‘प्रत्येक खेळाडूची संघात एक भूमिका आहे. ही भूमिका त्या त्या खेळाडूला स्पष्ट आहे. ही भूमिका कशी निभवायची हे त्यांना माहिती आहे आणि अनेक वर्ष ते ही भूमिका उत्तमपणे निभावत आहेत’, असं धोनी म्हणाला.
मात्र त्याचवेळी एका गोष्टीबाबत धोनीने राग आणि काळजी व्यक्त केली. तो म्हणाला, ‘मला दवाचा राग येतो. दवामुळे सगळी परिस्थिती बदलू शकते. मी खेळत असतानाही, दवाचा विषय निघाला की मला भीती वाटू लागे. नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्त्वाचा होऊन जातो. दवाचा मुद्दा लक्षात घेऊन डावपेच आखायला हवेत. आपण दहा सामने जगातल्या सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळणार असू, तर त्यापैकी बहुतांश आपण जिंकू. अर्थात परिस्थिती नेहमीसारखी म्हणजे दवविरहित असेल असं आपण गृहीत धरू’.
‘जेव्हा तुमच्या एखाद्या खेळाडूचा वाईट दिवस असतो. नेमकं त्याच दिवशी प्रतिस्पर्धी संघातील एखाद्या खेळाडूला सूर गवसावा. हे टी२० प्रकारात होतं. हे प्राथमिक फेरीत होऊ शकतं. बाद फेरीच्या सामन्यातही होऊ शकतं. त्यावेळी चाहत्यांच्या सदिच्छा कामी येतात’, असं धोनी म्हणाला.
‘कोणीही दुखापतग्रस्त होऊ नये अशी आपण प्रार्थना करूया. खेळाडूंना ज्या भूमिका दिल्या आहेत, ते ते निभावतील अशी आशा करूया’, असं धोनी म्हणाला.

