‘माझ्या डोक्यावर कर्ज आहे, अनेकांची देणी द्यायची आहेत. आयपीएल लिलावात मला कुणीच घेतलं नाही. माझ्यासाठी काहीतरी करा’, असं युनिव्हर्स बॉस अर्थात ख्रिस गेलने सांगितल्याचा दावा आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी केला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनशी ‘द ओव्हरलॅप क्रिकेट’ या पॉडकास्टमध्ये बोलताना मोदी यांनी हा दावा केला.
‘मी आयपीएल सोडून नुकताच लंडनला आलो होतो. धडाकेबाज फलंदाज आणि माझा मित्र ख्रिस गेलला आयपीएल लिलावात कुठल्याही संघाने घेतलं नाही. मला ख्रिसचा फोन आला. कुठल्याच संघाने समाविष्ट न केल्याने तो नाराज होता. मी त्याला म्हटलं की तू लौकिलाला साजेशी कामगिरी करू शकला नाहीस. आयपीएलमध्ये सातत्याने चांगलं कामगिरी करणं आवश्यक आहे. तुझ्या कामगिरीत सातत्य नव्हतं. तू कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळलास आणि मला असं वाटतं तुझी कामगिरी समाधानकारक नव्हती. तू चांगली कामगिरी करू शकला असतास पण तू आळसी झालास’, असं मोदी यांनी सांगितलं.
तो मला म्हणाला, ‘माझ्या डोक्यावर खूप मोठं कर्ज आहे. अनेकांची देणी चुकवायची आहेत. त्याचं बोलणं ऐकून मला कसंतरीच झालं. मग मी विविध संघाच्या लोकांना कॉल केले पण कोणीच ख्रिसला संघात घेण्यासाठी राजी झालं नाही’.
‘आरसीबीच्या संघाचे तत्कालीन मालक विजय माल्या जवळच राहायचे. मी त्यांच्याकडे गेलो. मी त्यांना म्हटलं, ख्रिसला एक संधी द्या. विजयने सांगितलं- वेगवान डर्क नॅन्सला दुखापत झाली आहे. त्यामुळे आम्ही बदली खेळाडूच्या शोधात आहोत. ख्रिस चांगलं खेळला तरच पैसे मिळतील. मी ख्रिसला म्हटलं, हीच संधी आहे. जा आणि खणखणीत कामगिरी कर. पुढे जे घडलं ते सर्वश्रुत आहे’.
‘त्याने त्याचं भविष्य लिहिलं. त्याने त्या क्षणानंतर कधीही मागे वळून पाहिलं नाही. तो कोट्यवधींचा मालक झाला’.
कानामागून आला आणि तिखट झाला या पद्धतीने गेलने मिळालेल्या संधीचं अक्षरक्ष: सोनं केलं. त्या हंगामात गेलने १२ सामन्यात ६०८ धावा फटकावल्या. १८३च्या स्ट्राईकरेटने धावा करताना गेलने ४४ षटकारांची लयलूट केली. सर्वाधिक धावांसाठीची मानाची ऑरेंज कॅप पटकावतानाच गेलने मालिकावीर पुरस्कारही पटकावला.
ख्रिस गेल हा आयपीएलची लोकप्रियता शिखरावर नेणाऱ्या शिलेदारांपैकी एक आहे. तडाखेबंद फटकेबाजी करत चाहत्यांचं मनोरंजन करण्यात गेल माहीर आहे. फलंदाजीच्या बरोबरीने तो उपयुक्त गोलंदाजीही करत असे. फिटनेसबाबत साशंकता असली तरी गेलला ज्या दिवशी सूर गवसत असे त्यादिवशी त्याचा संघ सामना जिंकत असे.
गेलची आकडेवारी युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी अशी आहे. या स्पर्धेत खेळताना गेलच्या नावावर १४२ सामन्यांमध्ये १४८च्या स्ट्राईकरेटने ४९६५ धावा आहेत. यामध्ये ६ शतकं आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत गेलने कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज या संघांचं प्रतिनिधित्व केलं. षटकार लगावण्याच्या बाबतीत गेल अव्वल स्थानी आहे. गेलच्या नावावर ३५७ षटकार आहेत.
२०१३ मध्ये गेलने पुणे वॉरियर्सविरुद्ध साकारलेली ६६ चेंडूत १७५ धावांची खेळी अविस्मसरणीय अशी मानली जाते. या खेळीदरम्यान गेलने १७ षटकार लगावले. एका आयपीएल इनिंग्जमध्ये हे सर्वाधिक षटकार आहेत. आयपीएल स्पर्धेत सगळ्यात कमी चेंडूत शतक झळकावण्याचा मान गेलच्याच नावावर आहे. गेलने ३० चेंडूत शतकी खेळी साकारली होती.
गेलने २०११ आणि २०१२ अशा सलग दोन हंगामात सर्वाधिक धावांसाठीचा ऑरेंज कॅप पुरस्कार पटकावला होता.
टेस्ट क्रिकेटमध्ये बदल आवश्यक
टेस्ट क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी त्यात आवश्यक बदल करायला हवेत असं मत मोदी यांनी नोंदवलं. टेस्ट सामने ४ दिवसांचे करावेत तसंच ते डे नाईट असावेत कारण चाहत्यांकडे आता तेवढा वेळ नाही. आयपीएल फ्रँचाइजींनी टेस्ट संघ विकत घ्यावेत. देशासाठी खेळण्याला सर्वोच्च प्राधान्य असेल पण क्लब पद्धतीने टेस्ट क्रिकेटचा विचार व्हावा. आयपीएल फ्रँजाइजींकडे युवा फौज उपलब्ध आहे. त्यांना टेस्ट क्रिकेटची गोडी लागावी असं वाटत असेल तर त्यांनी गुंतवणूक करावी.
द हंड्रेड स्पर्धा तीन चार वर्षात आटोपेल
टी२० चं पुढचं प्रारुप अर्थात द हंड्रेड स्पर्धा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सुरू केली आहे. याचे नियम पूर्णत: वेगळे आहेत. याबाबत मोदी यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, ‘द हंड्रेड स्पर्धा दोन ते तीन वर्षात संपेल. या स्पर्धेला मोठं भवितव्य नाही. ही स्पर्धा ऑगस्ट महिन्यात होते. हाच या स्पर्धेचा युएसपी आहे. स्पर्धेच्या प्रक्षेपणकर्त्या कंपनीने ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी पैसा खर्च केलेला नाही. त्यामुळे स्पर्धेच्या माध्यमातून मर्यादित पैसा मिळतो आहे’.
‘पुढे काय करायचं आहे हे ठोस ठरलेलं नाही. प्रक्षेपण वाहिनीला यातून हाती काही लागत नाही. खेळात पैसा येत नाही. संघमालकांना दोन तीन वर्षांनी केलेल्या गुंतवणुकीवर नफा मिळावा असं वाटतं. तसं झालं नाही तर ते निघून जातील. युके हे जाहिरात केंद्रित बाजारपेठ नाही. जगातली सगळ्यात मोठी सबस्क्रिप्शन पद्धतीचं मार्केट आहे. पर्याप्त असा सबस्क्रायबर बेस हवा’.
