टेनिसपटू सानिया मिर्झाला देण्यात आलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराबाबत केंद्र शासनावर मी कधीही टीका केली नाही, असे जागतिक बिलियर्ड्स विजेता पंकज अडवाणीने सांगितले.
खेलरत्न पुरस्काराबाबत पंकजने शासनावर टीका केली असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते मात्र या वृत्ताचे खंडन करीत पंकज म्हणाल की, ‘‘आजपर्यंत मी कोणत्याही खेळाडूवर टीका केलेली नाही व मी कधीही कोणत्याही वादात अडकलेलो नाही. असे असूनही मला विनाकारण या वादात ओढले आहे. सानियाचे मी कौतुकच केले आहे. ती खरोखरीच भारताची महान खेळाडू आहे. तिने आपल्या देशास अभिमानास्पद यश मिळवून दिले आहे. दहा वर्षांपूर्वी मी जेव्हा बिलियर्ड्स व स्नूकरच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीस सुरुवात केली, त्याच वेळी तिची आंतरराष्ट्रीय टेनिस कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. त्यामुळे मी तिचा खेळ खूप बारकाईने पाहिला आहे. मी तिच्या खेळाचे अनेक वेळा कौतुक केले आहे. पण असे असूनही काही जण विनाकारण माझ्यावर टीका करीत आहेत.’’
पंकजला २००४ मध्ये अर्जुन पुरस्कार व २००६ मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. विद्या पिल्ले, चित्रा मागिमाईराज व सौरव कोठारी या बिलियर्ड्स व स्नूकरच्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला नाही. त्या वेळी पंकजने या खेळाडूंना पुरस्कार मिळाला पाहिजे असे मत मांडले होते. याबाबत पंकज म्हणाला की, ‘‘मी फक्त अर्जुन पुरस्काराबाबत मत व्यक्त केले होते. आमच्या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विचार या पुरस्कारासाठी झाला पाहिजे अशी मी शासनाला विनंती केली होती. पुरस्काराबाबत विविध खेळांसाठी समान निकष लावले पाहिजेत. जर नियमावली असेल तर ती सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचली पाहिजे असे मी म्हटले होते.’’
‘‘प्रत्येक खेळाडूबद्दल मला नितांत आदर आहे. मी स्वत: जागतिक स्तरावर खेळत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव मला आहे. शासन आम्हा खेळाडूंच्या विकासाकरिता खूप प्रयत्न करीत असते हेदेखील मी ओळखतो. सर्व खेळाडूंसाठी समान निकष लावला पाहिजे असा माझा आग्रह आहे,’’ असेही पंकज याने सांगितले.