Virat Kohli Statement On His Mother: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे दमदार खेळी केली. त्याचं शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे २ मोठे विक्रम मोडून काढले. विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय सर्वात जलद २८,००० धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

सचिन तेंडुलकरच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकापेक्षा एक मोठ्या विक्रमांची नोंद आहे. हे विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. विराटने सचिनचा वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम २०२३ मध्ये मोडून काढला होता. आता तो सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकमेटमध्ये २८,००० धावा करण्याचा डोंगर सर केला आहे. हा पल्ला गाठणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. वडोदरा वनडेत या यादीत आणखी एका शतकाची भर पडणार होती. पण हे शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं.

सामना झाल्यानंतर विराट कोहलीला सामनावीर. पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विराट म्हणाला, “खरं सांगू तर, मी माझा संपूर्ण प्रवास पाहिला तर मला हे एका स्वप्नासारखे वाटते. ज्यावेळी मी या संघात आलो होतो, त्यावेळी मला माझ्या क्षमतेवर विश्वास होता. पण आज मी ज्या ठिकाणी आहे तिथे पोहोचण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. देवाने मला इतकं काही दिलंय की, माझ्याकडे तक्रार करण्यासाठी काहीच उरलेलं नाही. त्यामुळे मला फक्त कृतज्ञता वाटते.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “मी माझ्या सर्व ट्रॉफी गुरुग्राममध्ये माझ्या आईकडे पाठवून देतो. तिला त्या ट्रॉफी सांभाळून ठेवायला खूप आवडतं.” विराटने आतापर्यंत अनेक मोठे पुरस्कार जिंकले आहेत. हे सर्व पुरस्कार तो आपल्या आईकडे पाठवून देतो. विराट सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.