आजपर्यंत केलेल्या सरावाच्या जोरावर रिओ येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत माझे पदकाचे स्वप्न साकार होईल, असा आत्मविश्वास ऑलिम्पिक पात्रता निकष पूर्ण करणारा बॉक्सर विकास कृष्णन याने सांगितले.

विकास याने बाकू येथे झालेल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळविल्यानंतरच त्याचे ऑलिम्पिक तिकीट निश्चित झाले होते. आगामी ऑलिम्पिकविषयी विकास म्हणाला, ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी मला दोन लढती जिंकणे आवश्यक आहे. या लढतीत तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसेल अशी मी आशा करतो. विजेंदरसिंग याने ज्या वजनी गटात ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले, त्याच गटात मी भाग घेत असल्यामुळे माझ्यावर पदक जिंकण्याची जबाबदारी आहे. माझी आजपर्यंतची वाटचाल विजेंदरसारखीच झाली आहे. त्याने जागतिक स्पर्धेत कांस्य, आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. मी देखील हीच दोन्ही पदके जिंकली आहेत.

विकास याने २०१२ मध्ये लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्या वेळी त्याला उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या एरॉल स्पेन्स याने पराभूत केले होते.

विकास याने सांगितले, लंडन येथील ऑलिम्पिक माझ्यासाठी नवीन होती. त्यामुळे माझ्यावर थोडेसे दडपण होते. त्या वेळी मला लागोपाठ तीन दिवस लढती खेळाव्या लागल्या होत्या. विश्रांतीही घेता आली नव्हती. यंदा मात्र अनुभवाच्या जोरावर मी पदक पटकाविन. तेथे मी सर्वोत्तम कौशल्य दाखविण्यासाठी उतरणार आहे. बाकू येथील स्पर्धेच्या वेळी मला दुखापत झाली होती. त्यामधून शंभर टक्के तंदुरुस्त होण्यासाठी मला थोडे दिवस लागणार आहेत. व्हेनेझुएलामध्ये मी प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार आहे. तेथे दहा दिवस मी सराव करणार आहे. तेथे अनेक तुल्यबळ बॉक्सरबरोबर लढत देण्याची संधी मला मिळणार आहे. आगामी ऑलिम्पिकमध्ये शिवा थापा व मनोजकुमार हे देखील पदक मिळविण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत. खरंतर त्यांनी सुवर्णपदक मिळवावे अशी माझी इच्छा आहे.