पाच वर्ल्डकपविजेत्या ब्राझीलचं यंदाच्या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आल्यानंतर काही मिनिटातच नेयमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. नॉर्वेने २-१ अशी सरशी साधत क्वार्टरफायनलमध्ये आगेकूच केली. या धक्कादायक पराभवानंतर नेयमारने हा माझा ब्राझीलसाठी शेवटचा सामना होता असं जाहीर केलं. ब्राझीलला जिंकून देण्यासाठी मी अविरत प्रयत्न केले पण मी कमी पडलो असं म्हणत नेयमारने निवृत्ती जाहीर केली. ३४वर्षीय नेयमार सामन्यानंतर भावुक झाला होता. ३४वर्षीय नेयमारने १६ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्राझीलला सहावं जेतेपद मिळवून देण्यासाठी नेयमार प्रयत्नशील होता. नॉर्वेविरुद्धच्या लढतीत त्याने गोलही केला मात्र तो पुरेसा ठरला नाही. सामना संपताच, नेयमार पिचवरच बसला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. सहकाऱ्यांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळातच त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नेमारच्या नावावर आहे. ८० गोल आणि ५९ गोलसाठी सहाय्य या कामगिरीसह नेयमारने दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान पटकावलं. सर्वाधिक सामन्यात ब्राझीलचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नेयमार दुसऱ्या स्थानी आहे.

नेयमारने चार फुटबॉल वर्ल्डकपमध्ये तसंच दोनदा ऑलिम्पिकमध्ये ब्राझीलचं प्रतिनिधित्व केलं. २०१२ मध्ये ब्राझीलने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं होतं. नेयमार त्या संघाचा अविभाज्य भाग होता. २०१६ मध्ये ब्राझीलने ऑलिम्पिमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली त्या संघाचाही नेयमार आधारस्तंभ होता. दुखापतीमुळे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये नेयमार खेळणार का याविषयी साशंकता होती पण सगळे अडथळे पार करत तो फिट झाला.