Dasun Shanaka Statement: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये थरारक सामना पाहायला मिळाला. हा सामना श्रीलंकेसाठी फार महत्वाचा नव्हता. पण पाकिस्तानसाठी सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना २१२ धावा केल्या होत्या. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी २१३ धावा करायच्या होत्या. तर पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी श्रीलंकेला १४७ धावांवर रोखणं गरजेचं होतं. पण श्रीलंकेने १४७ धावांचा पल्ला गाठला आणि पाकिस्तानचा संघ सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला. त्यानंतर श्रीलंकेने सामना जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावला. पण शेवटी अवघ्या ५ धावांनी श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने श्रीलंकेच्या चाहत्यांची माफी मागितली.
श्रीलंकेचा संघ हा सामना जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. शेवटच्या षटकात २८ धावांची गरज असताना श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने षटकारांचा पाऊस पाडला. शेवटच्या २ चेंडूत ६ धावांची गरज असताना दोन्ही चेंडू निर्धाव राहिले आणि श्रीलंकेने हा सामना ५ धावांनी गमावला. श्रीलंकेकडून दासून शनाकाने ३१ चेंडूत ७६ धावांची खेळी केली.
हा सामना झाल्यानंतर बोलताना दासून शनाका म्हणाला, “कधी कधी खेळाडू म्हणून आमच्यावर खूप दबाव असतो. त्यामुळे माझ्याकडून चूक झाली. पुन्हा एकदा मी सर्व चाहत्यांची मनं दुखावल्याबद्दल माफी मागतो. मी खात्री देतो की, अशी चूक पुन्हा करणार नाही. सर्व खेळाडूंच्या वतीने मी सांगतो की, गेल्या अनेक वर्षांपासून जे लोक आमच्या पाठीशी उभे आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. चाहत्यांना निराश केल्याबद्दल मला मनापासून वाईट वाटत आहे.”
संघातील काही खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत. याबाबत बोलताना शनाका म्हणाला, “संघातील दोन महत्वाचे गोलंदाज संघात नसणे हे आम्हाला चांगलेच महागात पडले. ते जर संघात असते तर खूप फरक पडला असता. वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत संघातील मुख्य खेळाडू संघात असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळे संघाची ताकद आणि मानसिक बळ वाढते. आशा करतो की, ते लवकरच परततील आणि श्रीलंकन क्रिकेटसाठी चांगली कामगिरी करतील.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “कालच्या सामन्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. मी त्या सर्व चाहत्यांची माफी मागू इच्छितो कारण दुर्दैवाने या दुखापतींमुळे आमची पीछेहाट झाली. अन्यथा, आम्ही कदाचित उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलो असतो. भविष्यात जर कोणाला दुखापत झाली नाही, तर मला खात्री आहे की हा संघ चांगल्या खेळपट्ट्यांवर उत्तम कामगिरी करेल.”
