चंद्र ग्रहणामुळे भारतीय संघाचं सराव सत्र तासाभराने पुढे ढकलण्यात आल्याच्या वृत्ताला बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल यांनी दुजोरा दिला. टी२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलच्या लढतीत भारताची इंग्लंडशी लढत होणार आहे. यासाठी मंगळवारी भारतीय संघ सराव करणार होता. सरावाची वेळ संध्याकाळी ६ ते ९ अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र या वेळेत ग्रहण असल्याने भारतीय संघाने सरावाची वेळ पुढे ढकलली. इंग्लंड संघाने २ ते ५ वेळेत सराव केला.

खग्रास चंद्रग्रहण दुपारी ३.२० मिनिटांनी सुरू झालं. संध्याकाळी ६.४६ पर्यंत ग्रहण दिसणार होतं. भारतीय संघाने साडेतास नंतर सरावाला सुरुवात केली. ग्रहणात काय करावं, काय करू नये यासंदर्भात अनेक रूढी-परंपरा मानल्या जातात.

ग्रहणामुळे सरावाची वेळ पुढे ढकलण्यात आली का यासंदर्भात मॉर्ने मॉर्केलला प्रश्न विचारण्यात आला. संघाने यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार निर्णय घेण्यात आला असं मॉर्केल म्हणाला.

‘भारतीय संघ चांगल्या फॉर्मात आहे. परफेक्ट गेम याबाबत आम्ही चर्चा केलेली नाही. प्रत्येकजण विजयात योगदान देत आहे. झेल सुटले हे खरं आहे पण कोणी मुद्दामहून झेल सोडत नाही. चुका होऊ शकतात. सेमी फायनलसारख्या महत्त्वाच्या लढतीत असा चुका होऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. फिल्डिंग कोचच्या बरोबरीने सर्वच खेळाडू त्यासंदर्भात काम करत आहेत’.