Vaibhav Sooryavanshi Father Statement: आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे. आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेचा थरार नामिबीया आणि झिम्बाब्वेत पार पडला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडव १०० धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ४११ धावांचा डोंगर उभारला होता. यादरम्यान सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने १७५ धावांची विक्रमी खेळी केली. वैभवकडे द्विशतकी खेळी करण्याची सुवर्ससंधी होती. पण, त्याचं द्विशतक अवघ्या २५ धावांनी हुकलं. दरम्यान अंडर-१९ वर्ल्डकप जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

या संपू्र्ण स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने धावांचा पाऊस पाडला. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी राहिला. पण या दमदार फलंदाजीच्या बळावर त्याने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला. वैभवने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजाने त्याला सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत मागे सोडलं.

वैभव सूर्यवंशी ब्रायन लारा आणि युवराज सिंग या दोन्ही खेळाडूंना आपला आदर्श मानतो. त्याच्या फलंदाजीत दोघांच्या फलंदाजी शैलीची झलक दिसते. तो ब्रायन लारासारखीच मॅरेथॉन खेळी करण्याची क्षमता ठेवतो. यासह युवराज सिंगप्रमाणे जागेहून मोठे फटके देखील मारतो. पण त्याच्या वडिलांचं म्हणणं जरा वेगळं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, वैभव सूर्यवंशीचे वडील म्हणाले, “जोपर्यंत तो कसोटी क्रिकेट खेळत नाही, तोपर्यंत मी त्याला मोठा क्रिकेटपटू मानणार नाही.” वैभवने टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. पण त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करावं, असं त्याच्या वडिलांचं मत आहे. कारण त्याच्या वडिलांसाठी कसोटी क्रिकेट हेच गुणवत्तेचे खरे मोजमाप आहे.

कुठल्याही फलंदाजाची खरी कसोटी ही कसोटी क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असते. वैभव मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. गेल्यावर्षी झालेल्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात स्थान दिलं होतं. या संधीचा फायदा घेऊन त्याने गुजरात टायटन्सविरूद्ध दमदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याने अनेक दिग्गज गोलंदाजांविरूद्ध खेळताना मोठे फटके मारले होते. विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतही त्याने धावांचा पाऊस पाडला. आता अंडर-१९ वर्ल्डकपमध्येही त्याने दमदार कामगिरी केली आहे.