जागतिक मैदानी स्पर्धेत उत्तेजक सेवन केल्याच्या आरोपावरून आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने २८ खेळाडूंवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली आहे. २००५ व २००७ मध्ये झालेल्या या स्पर्धेच्या वेळी या खेळाडूंनी उत्तेजक घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. महासंघाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र बहुतेक खेळाडू आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्त झाले आहेत.
लुसाने येथील जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या प्रयोगशाळेमार्फत या खेळाडूंची चाचणी घेण्यात आली होती. प्रयोगशाळेचे संचालक मार्शल सॉगी यांनी याबाबत सांगितले की, ‘‘अत्यानुधिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत ही चाचणी घेण्यात आली. त्यामुळे पूर्वीच्या चाचणीत जी काही उत्तेजके सापडली नव्हती, ती उत्तेजकेही या चाचणीद्वारे दिसून आल्यामुळेच या खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे.’’
‘‘ज्या खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, त्यांची नावे मात्र जाहीर करण्यास कायद्यानुसार परवानगी नसल्यामुळे ही नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. या खेळाडूंपैकी काही खेळाडूंवर यापूर्वीच निलंबनाची कारवाई झालेली आहे, तर काही खेळाडू निवृत्त झाले आहेत. जे खेळाडू अद्याप खेळत आहेत, ते आगामी जागतिक स्पर्धेत सहभागी झालेले नाहीत,’’ असे आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने कळविले आहे.