Ibrahim Zadran Dedicate His POTM Award: अफगाणिस्तानने टी-२० विश्वचषक २०२६ मधील अखेरच्या गट टप्प्यातील सामन्यात कॅनडा संघावर ८२ धावांनी मोठा विजय नोंदवला. अफगाणिस्तानने न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धचे सुरूवातीचे दोन्ही सामने गमावल्याने त्याला प्राथमिक फेरीतून बाहेर पडावं लागलं. पण अखेरच्या सामन्यात विजय मिळवत संघाने सकारात्मकपणे वर्ल्डकप मोहिमेला पूर्णविराम दिला आहे. इब्राहिम झादरान अफगाणिस्तानच्या या विजयाचा हिरो ठरला. त्याने सामन्यानंतर कोणाला सामनावीर पुरस्कार समर्पित केला, जाणून घेऊया.
सलामीवीर इब्राहिम झादरान अखेरच्या चेंडूपर्यंत मैदानावर होता. इब्राहिम झादरान विश्वचषकातील सुरूवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. पण या सामन्यात त्याने मॅचविनिंग खेळी केली. इब्राहिम झादरानने या सामन्यात ५६ चेंडूत ७ चौकार व ५ षटकारांसह ९५ धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत मोहम्मद नबीने ४ विकेट्स घेतल्या.
अफगाणिस्तान संघासाठी या वर्ल्डकप मोहिमेचा शेवट फार भावुक करणारा ठरला. अफगाणिस्तान संघाचे कोट जोनाथन ट्रॉट यांचा हा संघाबरोबर अखेरचा सामना होता. कोच म्हणून जोनाथन ट्रॉट यांचा कार्यकाळ संपला असून सर्वच खेळाडूही भावुक दिसले. तर इब्राहिम झादरानने त्याचा सामनावीर पुरस्कार कोच जोनाथन ट्रॉट यांना समर्पित केला आहे. कर्णधार रशीद खाननेही ट्रॉटचे आभार मानले आणि अफगाणिस्तान संघाच्या यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असल्याचं सांगितलं.
इब्राहिम झादरानच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं
सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर इब्राहिम झादरान म्हणाला, मी या खेळीचा मनापासून आनंद घेतला. पहिल्या दोन डावांत मी स्वतःकडून ज्या प्रकारच्या खेळीची अपेक्षा केली होती, तशी कामगिरी करता आली नाही. पण शेवटच्या दोन सामन्यांत अफगाणिस्तानसाठी दमदार पुनरागमन करेन, असा मला पूर्ण आत्मविश्वास होता. आजचा दिवस माझा होता, मला फक्त माझ्या कौशल्यांवर विश्वास ठेवायचा होता.”
“दडपण आणि अपेक्षा नेहमीच असतात, पण अशा परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्याचा आणि आव्हान स्वीकारण्याचा मला आनंद वाटतो. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला, स्ट्राईक योग्य पद्धतीने रोटेट करत ठेवली, वाईट चेंडूंवर फटकेबाजी केली आणि माझ्या फलंदाजी जोडीदारासोबत मजबूत भागीदारी उभारली. सुदैवाने आमची योजना यशस्वी ठरली,” असं इब्राहिम झादरान त्याच्या खेळीबद्दल म्हणाला.
सामनावीर पुरस्कार कोचला डेडिकेट करताना इब्राहिम झादरान म्हणाला, “हा पुरस्कार मी आमचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांना समर्पित करू इच्छितो. त्यांनी मला नेहमी पाठिंबा दिला आणि आम्हा सर्वांना खूप प्रोत्साहन दिलं. आयसीसी स्पर्धांमध्ये आम्ही जे यश मिळवलं, त्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. आज त्यांचा आमच्यासोबतचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी मला अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. आम्हा सर्वांना त्यांची खूप आठवण येईल. आम्ही सर्वच त्यांना खूप मिस करू.”
