ICC Changes ODI WC Format: दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या २०२७ च्या एकदिवसीय (ODI World Cup 2027) विश्वचषकाबाबत आयसीसीने (ICC) महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या या बहुप्रतिक्षित विश्वचषकासाठी आता पूर्णपणे नवीन स्वरूप असणार आहे. आयसीसीने जाहीर केलेलं हे स्वरूप जे यापूर्वी कधीही पाहायला मिळालं नव्हतं. आयसीसीने बुधवारी, १५ जुलै रोजी ही घोषणा केली.
रोहित शर्मा व विराट कोहली आगामी २०२७ चा विश्वचषक खेळणार का यावर सर्वांच्या नजरा सध्या आहेत. भारतीय क्रिकेट संघातील हे दिग्गज खेळाडू प्रत्येक मालिकेत आपल्याला सिद्ध करू पाहत आहेत. यादरम्यान आता आयसीसीने या मोठ्या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये नवे बदल केले आहेत. वनडे विश्वचषक हा १४ संघांमध्येच खेळवला जाणार आहे, परंतु नवीन फॉरमॅटमुळे मुख्य फेरीत केवळ १२ संघ सहभागी होतील. याव्यतिरिक्त, उपांत्य फेरीतील संघ निश्चित करण्यासाठी पहिल्यांदाच ‘सुपर-७’ फेरी खेळवली जाईल.
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२७ मध्ये होणाऱ्या पुरुषांच्या एकदिवसीय (ODI) विश्वचषकाच्या फॉरमॅटबाबत गेल्या काही दिवसांत बरीच चर्चा झाली होती. सुरुवातीला, या स्पर्धेसाठी १४ संघांचा समावेश असलेली आणि २००३ च्या विश्वचषकासारखीच रचना अपेक्षित होती; ज्यामध्ये प्रत्येकी सात संघांचे दोन गट, त्यानंतर ‘सुपर-६’ फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना यांचा समावेश असणार होता. मात्र, आयसीसीने (ICC) आता या योजनेत बदल केला असून, स्पर्धेत पहिल्यांदाच ‘सुपर सिरीज’ आणि ‘सुपर-७’ फेऱ्यांचा समावेश केला आहे.
गेल्या काही रिपोर्ट्समध्ये असं समोर आलं होतं की स्पर्धेतील संघांची संख्या कमी केली जाईल. पण आयसीसीने (ICC) संघांची एकूण संख्या १४ इतकीच कायम ठेवली असली, तरी नवीन फॉरमॅटनुसार मुख्य फेरीत केवळ १२ संघच सहभागी होतील. याचा अर्थ असा की, गट फेरी सुरू होण्यापूर्वीच दोन संघ स्पर्धेतून बाहेर पडतील आणि परिणामी ही स्पर्धा प्रत्यक्षात १२ संघांची स्पर्धा बनेल.
२०२७च्या वनडे विश्वचषकाचा फॉरमॅट नेमका कसा आहे?
पहिली फेरी: विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या १४ संघांपैकी तळाच्या तीन संघांमध्ये ‘सुपर सिरीज’ खेळवली जाईल; ही मालिका साखळी पद्धतीने होईल. या सुपर सिरीजमधील विजेता संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करेल, तर उर्वरित दोन संघ स्पर्धेतून बाहेर पडतील.
दुसरी फेरी: (३० सामने) या फेरीपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल, ज्यात १२ संघांचा समावेश असेल. या १२ संघांची प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांत विभागणी केली जाईल. प्रत्येक गटातील सामने साखळी पद्धतीने खेळवले जातील. त्यानंतर, प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ ‘सुपर-७’ फेरीसाठी पात्र ठरतील. प्रत्येक गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ ‘सुपर-७’ मधील सातव्या स्थानासाठी स्पर्धा करेल.
तिसरी फेरी सुपर ७: (२१ सामने) या फेरीत सातही संघ एकमेकांविरुद्ध साखळी पद्धतीने खेळतील. या टप्प्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीत गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी भिडेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांमध्ये दुसरा उपांत्य सामना रंगेल.
