ICC T20 WC 2026 Team of The Tournament: भारतीय संघ यंदाच्या टी-२० विश्वचषक २०२६ चा विजेता ठरला आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा तब्बल ९६ धावांनी पराभव करत विक्रमी तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. संजू सॅमसन या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला. यासह आता आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२६ च्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे. ज्यामध्ये भारताच्या ४ खेळाडूंचा समावेश आहे, पण विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवचा मात्र यात समावेश नाही, या संघाचा कर्णधार आयसीसीच्या टीम ऑफ द टूर्नामेंटचा कॅप्टन आहे. पाहूया कसा आहे संघ?
आयसीसीच्या टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक विश्वविजेत्या भारतीय संघाच्या खेळाडूंचा समावेश आहे. चार भारतीय खेळाडू या संघात आहेत, तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन खेळाडू आहेत. आयसीसीने या संघात पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजमधील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश केला आहे. उपविजेत्या न्यूझीलंड संघातील एकाही खेळाडूचा या संघात समावेश नाही.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानचा साहिबजादा फरहान आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंट असलेला संजू सॅमसन यांची सलामी जोडी म्हणून निवड करण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी इशान किशनचा संघात समावेश आहे. इशान स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाजदेखील आहे. स्पर्धेच्या गट टप्प्यात शानदार गोलंदाजी करणाऱ्या अमेरिकेच्या शॅडली शान शाल्कविकला १२ वा खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे.
भारताच्या कोणकोणत्या खेळाडूंचा टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये समावेश?
२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील कामगिरीच्या आधारे आयसीसीच्या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हार्दिक पंड्या, संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्यासह स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. बुमराहने स्पर्धेत सर्वाधिक १४ विकेट्स घेतल्या आहेत. सुपर-८ टप्प्यात पोहोचलेल्या झिम्बाब्वे संघाच्या कामगिरीने यंदा सर्वांना प्रभावित केलं आणि संघातील ब्लेसिंग मुझारबानीची आयसीसी संघात निवड करण्यात आली आहे.
आयसीसीच्या टीम ऑफ द टूर्नामेंट संघाचा कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या एडन मारक्रमची निवड करण्यात आली आहे. पण भारताचा विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवची मात्र निवड झालेली नाही.
टी-२० विश्वचषक २०२६ आयसीसीची टीम ऑफ द टूर्नामेंट
साहिबजादा फरहान, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, एडन मारक्रम (कर्णधार), हार्दिक पंड्या, विल जॅक्स, जेसन होल्डर, जसप्रीत बुमराह, लुंगी एनगिडी, आदिल रशीद, ब्लेसिंग मुझाराबानी, शेडली शान शाल्क्विक (१२वा खेळाडू).
