scorecardresearch

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय खेळाडूंना डावलले! ; ‘आयसीसी’च्या सर्वोत्तम संघात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडू

भारतीय संघाला यंदा न्यूझीलंड येथे झालेली महिला विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सर्वोत्तम ११ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. या संघात भारताच्या एकाही खेळाडूला स्थान लाभलेले नसून विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंचा समावेश होता.

मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यंदा न्यूझीलंड येथे झालेली महिला विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, सातपैकी चार सामने गमावणाऱ्या भारताला बाद फेरी गाठण्यात अपयश आले. भारताकडून उपकर्णधार हरमनप्रीत कौरने सात डावांमध्ये ३१८ धावा, तर डावखुरी सलामीवीर स्मृती मानधनाने ३२७ धावा केल्या. या दोघींनीही एक शतक आणि दोन अर्धशतकांची नोंद केली. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये स्मृती आणि हरमनप्रीत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी होत्या. मात्र, या दोघींनाही ‘आयसीसी’च्या सर्वोत्तम संघात स्थान मिळू शकले नाही.

विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार मेग लॅिनग, यष्टीरक्षक-फलंदाज एलिसा हिली, रेचल हेन्स आणि बेथ मूनी या चार फलंदाज ‘आयसीसी’ सर्वोत्तम संघात होत्या. उपांत्य आणि अंतिम सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या हिलीची सलामीची साथीदार म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्व्हार्दची निवड करण्यात आली. २२ वर्षीय वोल्व्हार्दने या विश्वचषकात सर्वाधिक पाच अर्धशतके झळकावली. तिच्या आफ्रिकन संघातील सहकारी मारिझेन कॅप आणि शबनिम इस्माइल यांनाही ‘आयसीसी’च्या संघात स्थान लाभले. उपविजेत्या इंग्लंडची डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टोन आणि अष्टपैलू नॅट स्किव्हरचाही या संघात समावेश होता.

 ’ सर्वोत्तम संघ : मेग लॅिनग (कर्णधार), एलिसा हिली (यष्टीरक्षक), रेचल हेन्स, बेथ मूनी ; लॉरा वोल्व्हार्द, मारिझेन कॅप, शबनिम इस्माइल; सोफी एक्लेस्टोन, नॅट स्किव्हर,हेली मॅथ्यूज, सलमा खातून

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Icc announces team of women s world cup 2022 zws

ताज्या बातम्या