ICC Womens Champions Trophy 2027 India Host Schedule Details: आयसीसीने (ICC) महिला चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. पहिल्यावहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद आयसीसीने भारताला दिलं आहे. याचबरोबर, स्पर्धेचं वेळापत्रक आणि यजमान स्थळांचीही घोषणा करण्यात आली आहे. सहा संघांचा समावेश असलेली ही प्रतिष्ठित स्पर्धा मुंबई आणि वडोदरामध्ये खेळवली जाणार आहे.
महिला चॅम्पियन ट्रॉफीची ही स्पर्धा १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत भारतात खेळवली जाईल. आयसीसीच्या (ICC) माहितीनुसार, या स्पर्धेतील सर्व सामने मुंबईतील ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ (CCI) आणि वडोदरा येथील ‘वडोदरा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम’मध्ये आयोजित केले जातील. या स्पर्धेत भारतासह जगभरातील सहा अव्वल संघ विजेतेपदासाठी झुंज देतील.
‘आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७’ ही स्पर्धा खरंतर श्रीलंकेत आयोजित करण्याचं नियोजित होतं; परंतु आयसीसीच्या वार्षिक बैठकीत ठरलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असल्याने ही स्पर्धा भारतात खेळवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. आयसीसीने बांगलादेश, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा संभाव्य यजमान म्हणून विचार केला होता. त्यानंतर, या स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताची निवड करण्यात आली आणि १ सप्टेंबर रोजी आयसीसी बोर्डाने या निर्णयाला मंजुरी दिली.
महिला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणकोणते संघ खेळणार?
महिला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ सहभागी होणार आहेत. सर्व सामने टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवले जातील. सहा संघ ‘राउंड-रॉबिन’ पद्धतीने एकमेकांशी भिडतील आणि त्यानंतर अव्वल दोन संघ २८ फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील. भारत हा महिलांच्या वनडे विश्वचषकाचा विजेता आहे, तर ऑस्ट्रेलियाने अलीकडेच इंग्लंडमध्ये महिला टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे, महिलांच्या पहिल्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मध्ये या दोन संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
पाकिस्तान संघ महिला चॅम्पियन्स ट्रॉफीमधून का बाहेर झाला?
पाकिस्तान या स्पर्धेचा भाग असणार नाही. ६ जुलैच्या कट-ऑफ तारखेला जाहीर झालेल्या ICC महिला टी-२० क्रमवारीतील स्थानांच्या आधारे सहा संघांनी या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. स्पर्धेचा फॉरमॅट राऊंड रॉबिन पद्धतीचा असेल. म्हणजेच प्रत्येक संघाचा इतर पाचही संघांशी सामना होईल. साखळी फेरीअखेर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ २८ फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात आमनेसामने येतील.
महिला चॅम्पियन्स ट्रॉफी संबंधित महत्त्वाचे मुद्दे
फेब्रुवारी २०२७मध्ये मुंबई आणि वडोदरा येथे सहा संघांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) आणि वडोदरा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमध्ये स्पर्धेतील सामने खेळवले जातील.
पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) फॉरमॅटमध्ये करण्यात येणार आहे.
स्पर्धेत भारत आणि श्रीलंका हे दोनच आशियाई संघ सहभागी होणार असून पाकिस्तानला स्थान मिळालेलं नाही.
ही स्पर्धा सुरुवातीला श्रीलंकेत आयोजित करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं, मात्र नंतर यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलं.
