आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. आयर्लंडमधील एडिनबर्ग येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्यात आले; त्यापैकी आगामी एकदिवसीय (ODI) आणि टी-२० (T20) विश्वचषकांच्या फॉरमॅटमध्ये करण्यात आलेले बदल सर्वाधिक चर्चेत राहिले. मात्र, शाह यांनी क्रिकेट वेस्ट इंडिजसाठी आणखी एक मोठा निर्णयही जाहीर केला.

आर्थिक संकटात अडकलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला आयसीसी १२.८२ दशलक्ष डॉलर्सचे सुमारे १२३ कोटी रुपये कर्ज देत आहे. आयसीसीने (ICC) गेल्या आठवड्याच्या शेवटी एडिनबर्ग येथे ही बैठक आयोजित केली होती, ज्यामध्ये ‘क्रिकेट वेस्ट इंडीज’ला (CWI) कर्ज देण्याबाबत एक करार करण्यात आला. वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने आणि त्यांनी मदतीसाठी विनंती केल्यामुळे आयसीसीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. सदस्य देशांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबतचे आणि सदस्यत्वाशी संबंधित बाबींमधील महत्त्वाच्या बदलांचाच हा एक भाग आहे.

आयसीसीने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला का केली मदत?

वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी ही आर्थिक मदत अत्यंत कठीण काळात मिळाली आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षित अहवालानुसार, क्रिकेट वेस्ट इंडिजला (CWI) २ कोटी ८१.४० लाख अमेरिकन डॉलर इतका तोटा झाला. विशेष म्हणजे, याआधीच्या आर्थिक वर्षात संस्थेला २ कोटी ३१.२० लाख अमेरिकन डॉलर इतका नफा झाला होता.

दरम्यान, क्रिकेट वेस्ट इंडिजच्या महसुलात मोठी घसरण झाली आहे. २०२४ मध्ये ८ कोटी ८३.५० लाख अमेरिकन डॉलर असलेला महसूल २०२५ मध्ये ४ कोटी ८.९० लाख अमेरिकन डॉलर इतका खाली आला. म्हणजेच महसुलात ५३ टक्क्यांहून अधिक घट झाली. दुसरीकडे, दौरे आणि स्पर्धांवरील खर्च ३ कोटी ६८.५० लाख अमेरिकन डॉलरवरून ४ कोटी १५.९० लाख अमेरिकन डॉलर इतका झाला. या आर्थिक असमतोलाचा मोठा फटका क्रिकेट वेस्ट इंडिजच्या उपलब्ध रोख निधीलाही बसला. आर्थिक वर्षाच्या अखेरीस संस्थेकडे असलेला रोख निधी १ कोटी ७४.७० लाख अमेरिकन डॉलरवरून घसरून अवघ्या १६.८० लाख अमेरिकन डॉलर इतका राहिला.

याव्यतिरिक्त, आयसीसीने (ICC) एका नवीन क्रिकेट संघाबाबत निर्णय घेतला आहे. क्रिकेटच्या या सर्वोच्च संस्थेने ‘मॉरिशस क्रिकेट’ला ‘असोसिएट सदस्य’ (Associate Member) म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे आयसीसी-मान्यताप्राप्त क्रिकेट सदस्यांची एकूण संख्या १११ वर पोहोचली आहे; यामध्ये १२ ‘पूर्ण सदस्य’ (Full Member Nations) देशांचा समावेश आहे. दरम्यान, आयसीसीने सदस्यत्वाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘फ्रान्स क्रिकेट’ला नोटीस बजावली आहे, तसेच ‘कॅनडा क्रिकेट’वरील बंदी उठवण्यासाठीच्या अटींनाही मंजुरी दिली आहे.