करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावरही टांगती तलवार आहे. १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. त्यामुळे फार कमी कालावधीत टी-२० विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेचं आयोजन शक्य होईल का याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलत २०२२ साली ही स्पर्धा खेळवली जावी हा प्रस्तावर आयसीसीच्या २८ मे च्या बैठकीत येण्याची शक्यता आहे. आयसीसीशी संलग्न असलेल्या महत्वाच्या क्रिकेट बोर्ड अधिकाऱ्याने पीटीआयला ही माहिती दिली.

टी-२० विश्वचषकासाठी सध्या आयसीसी ३ पर्यायांचा विचार करत आहे. यामध्ये पहिला पर्याय हा स्पर्धा वेळापत्रकानुसार खेळवत प्रत्येक संघाला ऑस्ट्रेलियात १४ दिवस क्वारंटाइन करण्यात यावं, प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवली जावी हा दुसरा पर्याय तर संपूर्ण स्पर्धेचं आयोजन रद्द करत २०२२ साली स्पर्धेचं आयोजन करावं हा तिसरा पर्याय असल्याचं सुत्रांनी पीटीआयला सांगितलं. या बैठकीत आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांना २ महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यासोबत चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्याबद्दलही चर्चा होणार असल्याचं समजतंय.

अवश्य वाचा – टी-२० विश्वचषकाऐवजी आयपीएल खेळण्याला रवी शास्त्रींचा पाठींबा

टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाला मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. सध्याच्या लॉकडाउन काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटात सापडलं आहे. यामधून बाहेर येण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया वर्षाअखेरीस भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे या बैठकीत आयसीसी स्पर्धेबद्दल नेमका काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.