चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत प्रत्येक डावात बहरदार खेळी करत शिखर नव नवे विक्रम प्रस्थापित करताना दिसतो आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढल्यानंतर बर्मिंगहॅममध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवनने भारताचा माजी कर्णधार आणि सलामीवीर सौरभ गांगुलीचा चॅम्पियन करंडक स्पर्धेतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला. गांगुलीने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत १३ सामन्यांत ५१.१५ च्या सरासरीने ६६५ धावा केल्या होत्या. यात त्याच्या नैरोबीच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या नाबाद १४१ धावांच्या खेळीचा समावेश होता. सौरभ गांगुलीचा हा विक्रम शिखर धवनने मोडला आहे. २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पदार्पणात शिखर धवनने ५ सामन्यांत ३६३ धावा केल्या होत्या. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले. यावर्षी देखील त्याने आपल्या खेळीतील धमक दाखवत अवघ्या चार सामन्यांत ३१७ धावा ठोकल्या आहेत.

मागील चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सातत्य पुन्हा एकदा दाखवून देत धवनने यंदाच्या सर्वच सामन्यात दमदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धवन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला असला तरी त्याने या स्पर्धेतील सौरभ गांगुलीचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. धवनने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांत ३१७ धावा केल्या असून, भारताकडून चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. चॅम्पियन्स स्पर्धेत त्याने ९ सामन्यांत ६८० धावा केल्या आहेत. भारतीय फलंदाजांमध्ये त्याच्यानंतर १३ सामन्यांत ६६५ धावा करणारा गांगुली दुसऱ्या स्थानावर असून, १९ सामन्यात ६२७ धावा करुन द्रविड तिसऱ्या स्थानावर आहे.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्टइंडिजच्या क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने १७ सामन्यात तब्बल ७९१ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर या यादीत श्रीलंकेचा महेला जयवर्धने असून त्याने २१ सामन्यात ७२४ धावा ठोकल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर देखील श्रीलंकेच्या फलंदाज आहे. कुमार संगकाराने आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील २१ सामन्यात ६८३ धावा जमवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीत धवन चौथ्या स्थानावर पोहचला असून अवघ्या ९ सामन्यात त्याने हा करिश्मा केला आहे.