चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताने रुबाबात सुरुवात केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लडच्या मैदानात रविवारी रंगलेल्या सराव सामन्यात भारताने ४५ धावांनी विजय मिळविला. या स्पर्धेतील गतविजेता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारताला डकवर्थ लुइस नियमानुसार, विजयी घोषित करण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली. निर्धारित ३८.४ षटके खेळत न्यूझीलंडचा संघ अवघ्या १८९ धावात गारद झाला.

न्यूझीलंडने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. अजिंक्य रहाणे अवघ्या ७ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर शिखर धवनने ४४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तो चांगली फटकेबाजी करत असताना निशॅमने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर सराव सामन्यात संघात संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकला खाते उघडता आले नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला तेव्हा भारताने २६ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात १२९ धावा केल्या होत्या. कर्णधार विराट कोहली ५२ आणि धोनी १७ धावांवर खेळत होते. डकवर्थ लुइस नियमानुसार भारताला ४५ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

न्यूझीलंडकडून यष्टीरक्षक रॉन्ची (६६) आणि जॅंम्सने (४६) धावांची खेळी केली. या दोघांशिवाय एकही किवी फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर तग धरु शकला नाही. भारताकडून भूवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी ३ तर रवींद्र जाडेजाने २ आणि अश्विन आणि यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला.