यजमान इंग्लंडने अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून विश्वविजेतेपद पटकावले. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

या सामन्यात बेन स्टोक्स याने सर्वोत्तम कामगिरी केली. केवळ मूळ सामन्यातच नव्हे तर सुपर ओव्हरमध्येही त्याने चांगली फलंदाजी केली आणि संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिले. त्याला सामनावीर देखील घोषित करण्यात आले. बेन स्टोक्सच्या खेळीचे अनेकांनी कौतुक केले. पण त्यापेक्षा अधिक कौतुक झाले ते पराभूत संघाचा कर्णधार केन विल्यमसन याचे.. सामन्याचा निकाल संघाच्या बाजूने लागला नसूनही विल्यमसनने चेहऱ्यावर हास्य ठेवत तो पराभव स्वीकारला. त्याला मालिकावीराचा ‘किताब प्रदान करण्यात आला. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही लढवय्या कर्णधार केन विल्यमसनचे कौतुक केले.

“बेन स्टोक्सने अंतिम सामन्यात दडपणाच्या स्थितीत उत्तम कामगिरी केली. त्याच्याकडे ती खास प्रतिभा आहे. केन विल्यमसननेदेखील मला प्रभावित केले. त्याने ज्या प्रकारचा खेळ करून दाखवला, ज्या प्रकारे तो मैदानावर वावरत होता आणि ज्या प्रकारे त्याने संघाचे नेतृत्व केले, त्या साऱ्या गोष्टी पाहून मी त्याच्या प्रेमात पडलो आहे.”, अशा शब्दात सचिनने दोघांचे आणि विशेषतः केन विल्यम्सनने कौतुक केले.

दरम्यान, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.