विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडो युनिटचे, बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घातले होते. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आयसीसीने बीसीसीआयला धोनीला ते ग्लोव्ह्ज न घालण्यास सांगितलं. यानंतर भारतीय चाहत्यांनी आयसीसीच्या भूमिकेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली तीव्र नापसंती दर्शवली. भारतीय प्रसारमाध्यमांनीही आयसीसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत धोनीला पाठींबा दर्शवला.

भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या कपिल देव यांनी मात्र या वादावर आता पडदा टाकण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. ते एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. “प्रत्येक खेळाडूने आयसीसीचे नियम पाळणं बंधनकारक असतं. धार्मिक, राजकीय गोष्टी खेळामध्ये येणार नाही असा आयसीसीचा नियम आहे. जरी धोनीने लष्कारचं बलिदान चिन्ह आपल्या ग्लोव्ह्जवर वापरलं असलं तरीही त्याच्यातून पैसे कमावणं हा त्याचा उद्देश नक्कीच नव्हता. त्यामुळे या प्रकरणात आयसीसीला एक विनंती करणारं पत्र लिहून या वादावर आता पडदा टाकायला हवा.”

दरम्यान या प्रकरणात भारतीय क्रीडाप्रेमी, बीसीसीआय, केंद्रीय क्रीडामंत्री यांनी धोनीला पाठींबा दर्शवला आहे. बीसीसीआयने धोनीला बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालून खेळण्याची परवानगी द्यावी अशी विनंतीही आयसीसीकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आयसीसी काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – क्रिकेटला भारतीय राजकारणाचा फड बनवू नका ! धोनी ग्लोव्ह्ज वादावर पाक मंत्र्यांचं वक्तव्य