India vs West Indies 3rd ODI ICC fine details: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका यजमान संघाने २-१च्या फरकाने जिंकली. वेस्ट इंडिज संघाने तिसऱ्या एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत भारतावर विजय मिळवला आणि मालिकेचा शेवट गोड केला. तर भारताने मालिकेतील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत मालिकेत अभेद्य आघाडी मिळवत मालिका आपल्या नावे केली होती. पण या मालिकेनंतर आयसीसीने भारत आणि वेस्ट इंडिज अशा दोन्ही संघांवर कारवाई केली आहे, का ते जाणून घेऊया.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे ICCने दोन्ही संघांवर कारवाई केली आहे. न्यू चंदीगडमधील PCA इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला.ICCच्या माहितीनुसार, भारत निर्धारित ओव्हर रेटपेक्षा चार षटकं मागे होता, तर वेस्ट इंडिजचा संघ दोन षटकं मागे होता. भारत चार षटकं मागे असल्यानेच त्यांना अखेरच्या षटकांमध्ये मोठा फटका बसला आणि परिणामी वेस्ट इंडिजने सामना जिंकला होता.
या उल्लंघनासाठी भारतीय खेळाडूंना त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या २० टक्के दंड, तर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. ICCच्या निवेदनानुसार, एमिरेट्स आयसीसी आंतरराष्ट्रीय सामना पंचांच्या गटाचे प्रकाश भट्ट यांनी ही कारवाई केली. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपली चूक मान्य केली. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही.
भारताने वनडे मालिका २-१ ने जिंकली
तिसऱ्या वनडेत भारताचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकांत ७ विकेट गमावून ३५१ धावा केल्या. केएल राहुलने नाबाद १२९ धावांची खेळी, तर रोहित शर्माने ९२ धावा करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. ३५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने ४८.२ षटकांत ५ विकेट्स गमावून सामना जिंकला. कर्णधार शे होपने १४३ चेंडूत १६२ धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
होपव्यतिरिक्त वेस्ट इंडिजचा फलंदाज अमीर जांगूने अर्धशतक झळकावलं, तर किमो पॉलनेही ४०हून अधिक धावांचं योगदान दिलं. मात्र, या सामन्यातील पराभवानंतरही भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ ने आपल्या नावावर केली.
