ICC Punishment to Pakistan Cricket team: आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानी संघ सध्या २०२५-२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्राचा भाग म्हणून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर आहे. पहिला सामना मीरपूरमध्ये खेळला गेला आणि त्यात पाकिस्तानी संघ १०४ धावांनी पराभूत झाला.

आता आयसीसीने मिरपूर कसोटीतील स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानी संघावर मोठी कारवाई केली असून, यामध्ये त्यांच्या सामना शुल्कावर दंड आकारण्यासोबतच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या गुणतालिकेतून त्यांचे गुणही मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. आधीच पाकिस्तान संघाची कसोटीत अवस्था बिकट असताना आयसीसीने केलेल्या या कारवाईचा संघाला मोठा फटका बसला आहे.

आयसीसीच्या पाकिस्तान संघाला ठोठावलेल्या दंडामधील अहवालात असं म्हटलं आहे की, मीरपूर स्टेडियममध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्यांनी निर्धारित वेळेपेक्षा आठ षटकं कमी टाकली. परिणामी, खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्काच्या ४० टक्के दंड आकारण्यात आला आणि कमी टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी एक गुण वजा करण्यात आला. यामुळे, पाकिस्तानी संघाने पराभवासाठी केवळ एक गुणच गमावला नाही, तर एकूण आठ गुण गमावले.

आयसीसीच्या या कारवाईनंतर आता, त्यांचे एकूण फक्त ४ गुण शिल्लक आहेत, ज्यामुळे पाकिस्तानी संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ गुणतालिकेत थेट ८व्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये केवळ वेस्ट इंडिज संघ त्यांच्या खाली आहे, ज्यांच्या गुणांची एकूण टक्केवारी ४.१७ आहे.

पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल आयसीसीने संघावर केलेली कारवाई स्वीकारली असून, या प्रकरणात आता कोणतीही पुढील औपचारिक सुनावणी होणार नाही. मैदानातील पंच रिचर्ड केटलबरो आणि कुमार धर्मसेना, तसेच तिसरे पंच अलाउद्दीन पालेकर आणि चौथे पंच गाझी सोहेल यांनी पाकिस्तानी संघावर स्लो ओव्हर रेटसाठी आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर, सामनाधिकारी जेफ क्रो यांनी प्रकरण ऐकून दंडात्मक कारवाई केली. दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना १६ मेपासून सिल्हेट येथे खेळलला जाईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिका

१. ऑस्ट्रेलिया – ८४ गुण – ८७.५० टक्के
२. न्यूझीलंड – २८ गुण – ८८.७८ टक्के
३. दक्षिण आफ्रिका – ३६ गुण – ७५ टक्के
४. श्रीलंका – १६ गुण ६६.६७ टक्के
५. भारत – ५२ गुण – ४८.१५ टक्के
६. बांगलादेश – १६ गुण – ४४.४४ टक्के
७. इंग्लंड – ३८ गुण – ३१.६७ टक्के
८. पाकिस्तान – ४ गुण – ११.११ टक्के
९. वेस्ट इंडिज – ४ गुण – ४.१७ टक्के