ICC has fined England and Australia for slow over rate: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच संपली. ॲशेस मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली, परंतु ऑस्ट्रेलियाने गतविजेते म्हणून ट्रॉफी राखली. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने पहिल्या दोन सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर मालिका बरोबरीत संपवली. या मालिकेनंतर आयसीसीने दोन्ही संघाला मोठा दणका दिला आहे. आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी दोन्ही संघांना दंड ठोठावला आहे.
त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत संघाचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ गुणांमध्येच फरक नाही, तर विजयाच्या टक्केवारीतही मोठी घसरण झाली आहे. ॲशेसदरम्यान स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने हे पाऊल उचलले आहे. आयसीसीने वेबसाइटवर पोस्ट केलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये, बुधवारी सांगितले की, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियालाॲशेसमध्ये निर्धारित वेळेत कमी टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी एक डब्ल्यूटीसी पॉईंट आणि मॅच फीची कपात करण्यात आली आहे.
आयसीसीने म्हटले आहे की, “सुधारित नियमांनुसार, दोन्ही संघांना त्याच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर निर्धारित वेळेत कमी टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी एक डब्ल्यूटीसी पॉइंट कट केला आहे.” ॲशेसच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला स्लो ओव्हर रेटसाठी १० गुणांची कपात करण्यात आली. यजमान इंग्लंडला मात्र ॲशेसमध्ये अधिक त्रास सहन करावा लागला आणि पाचपैकी चार कसोटी सामन्यांमध्ये स्लो ओव्हर-रेटसाठी १९ गुणांची कपात करण्यात आली आहे.
हेही वाचा – Shardul Thakur: “जर माझी विश्वचषकासाठी निवड झाली नाही, तर…”; तिसऱ्या वनडेनंतर शार्दुल ठाकुरच मोठं वक्तव्य
आयसीसीने सांगितले की, “इंग्लंड एजबॅस्टन येथील पहिल्या कसोटीत निर्धारित वेळेत दोन षटके, लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत नऊ, ओल्ड ट्रॅफर्डवरील चौथ्या कसोटीत तीन आणि ओव्हलवरील पाचव्या आणि अंतिम कसोटीत पाच षटके कमी टाकली होती.” अशाप्रकारे इंग्लंडचे पहिल्या कसोटीत दोन गुण, दुसऱ्या कसोटीत नऊ गुण, चौथ्या कसोटीत तीन गुण आणि पाचव्या कसोटीत पाच गुण असे एकूण १९ गुण कपात केले.
हेही वाचा – Ajinkya Rahane: “…म्हणून कौंटी चॅम्पियनशिपमधून माघार घेतली”; अजिंक्य रहाणेने ट्विट करुन केला खुलासा
आयसीसीने पुढे सांगितले की, “मँचेस्टर कसोटीत (चौथ्या कसोटी) १० षटके कमी गोलंदाजी केल्याबद्दल ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.”इंग्लंडला पहिल्या कसोटीसाठी १० टक्के, दुसऱ्या कसोटीसाठी ४५ टक्के, चौथ्या कसोटीसाठी १५ टक्के आणि पाचव्या कसोटीसाठी २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.