ICC Player of the Month नामांकन जाहीर; डेव्हॉन कॉन्वेसह 'या' दोन भारतीयांमध्ये चुरस, पाहा कोण आहेत | Loksatta

ICC Player of the Month नामांकन जाहीर; डेव्हॉन कॉनवेसह ‘या’ दोन भारतीयांमध्ये चुरस, पाहा कोण आहेत

ICC Player of the Month: जानेवारी २०२३ साठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये दोन भारतीय असून एक फलंदाज आणि एक गोलंदाज आहे.

ICC Player of the Month
टीम इंडिया (फोटो-ट्विटर)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी महिन्यातील कामगिरीच्या आधारे खेळाडूंना एक पुरस्कार देत आहे. त्यामुळे मंगळवारी आयसीसीने जानेवारी २०२३ साठी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकने जाहीर केली. दरवेळेप्रमाणे आयसीसीने गेल्या महिन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंची निवड केली आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे.

आयसीसीने दोन भारतीय आणि एका न्यूझीलंडच्या खेळाडूची प्लेअर ऑफ द मंथ नामांकन म्हणून निवड केली आहे. भारताच्या शुबमन गिल आणि मोहम्मद सिराजला यांना स्थान मिळाले आहे, तर न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेचा देखील समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही खेळाडूंनी जानेवारी महिन्यात क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

१. डेव्हॉन कॉनवे-

न्यूझीलंडचा धडाकेबाज डेव्हॉन कॉनवेने गेल्या वर्षीपासून आपला धमाकेदार फॉर्म कायम ठेवला आहे. कॉनवेने यावर्षी दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर या महिन्यात न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील आहे. कॉनवेने यावर्षी भारताविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळून सर्वांना आश्चर्यचकित केले. या कामगिरीमुळे त्याला या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

२. शुबमन गिल –

भारतीय संघाचा उगवता स्टार शुबमन गिल त्याच्या कामगिरीने सर्वांचे गळ्यातील ताईत बनला आहे. जानेवारी महिना त्याच्यासाठी खूप खास होता. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात त्याने २१२ धावांची खेळी साकारली आणि अनेक मोठे विक्रम मोडले. यानंतर गिलने टी-२० मध्येही शतक झळकावले. त्यामळे आयसीसीच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज फलंदाजाचा ‘रिंग ऑफ पॉवर’वर विश्वास; सांगितले अंगठीची रंजक कहाणी, पाहा VIDEO

३. मोहम्मद सिराज –

भारतीय संघाचा खतरनाक गोलंदाज मोहम्मद सिराजसाठी जानेवारी महिना स्वप्नापेक्षा कमी नव्हता. सिराजला या महिन्यात वनडेत नंबर १ गोलंदाज होण्याचा मुकुट मिळाला. याशिवाय त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १० हून अधिक बळी घेतले. ज्यामध्ये त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या कामगिरीमुळे सिराजला या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 16:39 IST
Next Story
On This Day: जेव्हा पाकिस्तानची होते पळताभुई थोडी…; जंबोच्या तुफान पराक्रमाची गाथा सांगणारा video खुद्द BCCIने च केला शेअर