ICC ODI Batting Ranking: आयसीसी (ICC) क्रमवारीमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विशेषतः गेल्या आठवड्यात झालेल्या रोमांचक कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमुळे क्रमवारीमध्ये मोठे बदल झाले आहेत. इंग्लंडच्या जो रूटने कसोटी फलंदाजांच्या यादीत पुन्हा अव्वल स्थान पटकावलं आहे, तर भारतीय कर्णधार शुबमन गिलने एकदिवसीय क्रमवारीमध्ये मोठी झेप घेत अव्वल स्थानाच्या अगदी जवळ धडक मारली आहे. याशिवाय वनडे क्रमवारीत भारताच्या फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे.

आयसीसी (ICC) कसोटी क्रमवारीत, जो रूटने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे. यावेळी त्याने दोन स्थानांची प्रगती केली असून त्याचे रेटिंग ८७१ वर पोहोचलं आहे. दुसरीकडे, इंग्लंडचाच खेळाडू हॅरी ब्रूक जो अवघ्या एका आठवड्यापूर्वीच अव्वल स्थानावर पोहोचला होता, तो एका स्थानाने घसरून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग ८६६ आहे. ट्रॅव्हिस हेड देखील एका स्थानाने खाली घसरला असून दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे; त्याचे रेटिंग ८५३ आहे. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने दोन स्थानांची झेप घेत करत ७१५ रेटिंगसह १०वं स्थान गाठलं आहे.

तर कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा मॅट हेन्नी व भारताचा जसप्रीत बुमराह संयुक्तपणे पहिल्या स्थानी आहेत. दोघांचे रेटिंग गुण ८७० इतके आहेत. मॅट हेन्नीने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ११ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या बळावर न्यूझीलंड संघाने इंग्लंडवर मोठा विजय मिळवला.

फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत भारताच्या फलंदाजांचा दबदबा

वनडे क्रमवारीत न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल सर्वाधिक ८१५ गुणांसह पहिल्या स्थान आहे. दरम्यान, शुबमनने तीन स्थानांची प्रगती करत थेट दुसरं स्थान गाठलं आहे आणि त्याचे रेटिंग ७९१ वर पोहोचले आहे. एकदिवसीय मालिका न खेळल्यामुळे विराट कोहली दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. रोहित शर्मा ७५४ रेटिंगसह चौथ्या स्थानावर कायम आहे. याशिवाय केएल राहुल ११व्या स्थानी आहे. तर संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर १४व्या स्थानी आहे. इशान किशनला २१ स्थानांचा फायदा झाला असून तो आता ४३ व्या स्थानी पोहोचला आहे. तर यशस्वी जैस्वालने ८४ स्थानांची झेप घेतली असून ७१व्या स्थानी पोहोचला.