ICC RANKINGS : मिताली पुन्हा अव्वल, भारताची ‘नॅशनल क्रश’ही चमकली

१६ वर्षांपूर्वी मितालीने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवले होते.

icc odi rankings mithali raj became top-rated batter
मिताली राज आणि स्मृती मंधाना

भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने आयसीसीच्या एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पुन्हा प्रथम स्थान मिळवले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रमवारीत मितालीने ही कामगिरी केली. आता मितालीचे ७६२ रेटिंग गुण झाले आहेत. भारतीय कर्णधार आतापर्यंतच्या एकदिवसीय कारकीर्दीत नवव्यांदा प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. १६ वर्षांपूर्वी तिने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवले होते.

महिला क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०३च्या सरासरीने २०६ धावा केल्या. या मालिकेत ती सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होती. २००५मध्ये ती पहिल्यांदा एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांकाची फलंदाज ठरली होती.

 

 

गेल्या आठवड्यात प्रथम क्रमांकाची फलंदाज ठरलेली वेस्ट इंडीजची स्टेफनी टेलर चार स्थानांनी घसरत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेची लिजेल ली, ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली आणि इंग्लंडची टॅमी ब्यूमॉन्ट यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि चौथे स्थान मिळवले आहे. भारताची ‘नॅशनल क्रश’ म्हणजेच स्मृती मंधाना ७०१ रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर आहे. मिताली आणि मंधाना व्यतिरिक्त इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला पहिल्या १० मध्ये स्थान मिळालेले नाही.

गोलंदाजांच्या यादीत झुलन गोस्वामी ही पहिल्या दहा क्रमांकात असणारी एकमेव भारतीय गोलंदाज आहे. तिला पाचवे स्थान मिळाले आहे, तर दीप्ती शर्मा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत १०व्या स्थानावर आहेत.

स्मृतीची टी-२० क्रमवारीत जबरदस्त कामगिरी

स्मृती मंधानाने टी-२० क्रमवारीत करिअरमधील सर्वोत्कृष्ट तिसरे स्थान मिळवले आहे. तिच्याखेरीज दीप्ती शर्मा ३६ व्या आणि रिचा घोष ७२व्या स्थानावर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Icc odi rankings mithali raj became top rated batter adn

ताज्या बातम्या