ICC ODI Rankings: icc क्रमवारीत शुबमन गिलची हनुमान उडी! विराट कोहली-रोहित शर्माला टाकले मागे

ICC Rankings: आयसीसीची नवीन एकदिवसीय क्रमवारी आली आहे. यामध्ये शुबमन गिलने प्रथमच टॉप १० मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. विराट कोहलीचे थोडे नुकसान झाले आहे, तर रोहित शर्माला फायदा झाला आहे.

The new ICC ODI rankings have arrived In this, Shubman Gill has made his place in the top 10 for the first time
सौजन्य- आयसीसी (ट्विटर)

ICC Rankings: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपुष्टात आली आहे. या मालिकेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला. या मालिकेत भारतीय संघाचा युवा खेळाडू आणि सलामीवीर शुबमन गिलने वेगवान फलंदाजी केली. गिलने या मालिकेत ३६० धावा करत बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली. या कामगिरीचा फायदा गिलला आयसीसी क्रमवारीत मिळाला आहे. यात गिल आता सहाव्या स्थानावर आला आहे.

शुबमन गिलने या क्रमवारीत कमालीची प्रगती केली आहे. त्याने द्विशतक आणि एक शतक झळकावले असून त्यानंतर क्रमवारीत जबरदस्त झेप घेतली आहे. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला थोडासा फटका बसला असला तरी रोहित शर्माने शेवटच्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावले आहे, त्यानंतर त्याच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. आता भारताचे टॉप टेन रँकिंगमध्ये तीन फलंदाज आहेत, ज्यामध्ये शुबमन गिल आघाडीवर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आजही नंबर वनच्या खुर्चीवर विराजमान आहे. यावेळी क्रमवारीमध्ये प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत.

आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलला याचा चांगलाच फायदा झाला आहे. एक प्रकारे त्याने हनुमान उडी घेत तो प्रथमच टॉप १० मध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाला आहे. मागील क्रमवारीत अव्वल २० मध्येही नसलेला शुबमन गिल आता सहाव्या क्रमांक मिळवण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान, टॉपर्सबद्दल सांगायचे तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८८७ च्या रँकिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर रासी व्हॅन डर डुसेन दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचे रेटिंग ७६६ वर पोहोचले आहे. यानंतर क्विंटन डिकॉक तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचे रेटिंग आता ७५९ आहे. डेव्हिड वॉर्नर चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याचे रेटिंग आता ७४७ आहे. याआधी विराट कोहली चौथ्या क्रमांकावर होता, मात्र आता विराट कोहलीचे काहीसे नुकसान झाले आहे. पाकिस्तानचा इमाम-उल-हक ७४० रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. यानंतर शुबमन गिलचा नंबर आला आहे.

हेही वाचा: IND vs NZ: ‘तीन वर्षानंतर शतक?’ प्रश्नावर संतापला रोहित शर्मा, फॉर्मविषयी बोलणाऱ्या ब्रॉडकास्टर्सना सुनावले खडे बोल

शुबमन गिलचे रेटिंग ७३४ वर गेले असून तो सहावा क्रमांक पटकावण्यात यशस्वी झाला आहे. शुबमन गिलचे हे आतापर्यंतचे सर्वोत्तम वन डे रँकिंग आहे. गिलनंतर विराट कोहली सातव्या क्रमांकावर आला असून त्याचे रेटिंग आता ७२७ वर पोहोचले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीची फलंदाजी त्याप्रमाणे गेली नाही ज्यासाठी तो ओळखला जातो, त्यामुळे तो आता खाली आला आहे. आठव्या क्रमांकाबद्दल बोलायचे झाल्यास, स्टीव्ह स्मिथने ७१९ च्या रेटिंगसह येथे स्थान मिळवले. त्याचवेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आता ७१९च्या रेटिंगसह नवव्या क्रमांकावर आला आहे. त्याला मागील क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात १०१ धावा केल्यानंतर रोहित शर्माला एका स्थानाचा फायदा झाला आहे. जॉनी बेअरस्टो ७१० रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 11:02 IST
Next Story
विश्लेषण: फुटबॉलमध्ये व्हाईट कार्डचा वापर का केला जातो? ‘फिफा’ची मान्यता मिळणार का?
Exit mobile version