ICC ODI World Cup 2027 new format breakdown: आयसीसीने आगामी वनडे विश्वचषक २०२७ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. ही आयसीसी (ICC) स्पर्धा पुढील वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत खेळवली जाणार आहे. त्यासाठी संघांनी आधीच तयारी सुरू केली आहे. दरम्यान, वनडे विश्वचषक हा २०२७ मध्ये वेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. हा फॉरमॅट नेमका कसा आहे आणि कोणते संघ कसे खेळणार जाणून घेऊया.

पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया भूषवणार आहेत. या स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी होतील. विश्वचषक एकूण चार टप्प्यांमध्ये खेळवला जाईल. स्पर्धेच्या नव्या फॉरमॅटनुसार स्पर्धेची सुरुवात ‘सुपर सिरीज’ने होईल, त्यानंतर मुख्य गट सामने (group rounds) आणि त्यानंतर ‘सुपर ७’ टप्पा असेल. त्यानंतर उपांत्य सामने आणि अंतिम सामना खेळवला जाईल. मात्र, उद्घाटन सामना आणि अंतिम सामन्याच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत; पहिला सामना २ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे.

चार टप्प्यांमध्ये खेळवली जाणार वनडे विश्वचषक २०२७ स्पर्धा

पहिला टप्पा ‘सुपर सिरीज’ असेल; विश्वचषकात ही संकल्पना पहिल्यांदाच आणली जात आहे. स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या १४ संघांपैकी सर्वात कमी मानांकन असलेल्या तीन संघांमध्ये ही मालिका खेळवली जाईल. या ‘सुपर सिरीज’मध्ये अव्वल स्थान मिळवणारा संघ विश्वचषकातील पुढील फेरीत प्रवेश करेल, तर उर्वरित दोन संघांचे आव्हान तिथेच संपुष्टात येईल.

सुपर सीरीजचा विजेता संघ गट टप्प्यात

सुपर सीरीजनंतर मुख्य गट फेरीतील सामने सुरू होतील. ‘सुपर सिरीज’मधील विजेता संघ इतर ११ संघांमध्ये सामील होईल, ज्यामुळे संघांची एकूण संख्या १२ होईल. या संघांमध्येच मुख्य सामने खेळवले जातील. या १२ संघांची प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांत विभागणी केली जाईल. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांविरुद्ध खेळेल; म्हणजेच, प्रत्येक संघाला पाच सामने खेळावे लागतील. यानंतर, प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ तसेच गुण किंवा ‘नेट रन रेट’च्या आधारे उर्वरित संघांमध्ये सर्वाधिक वरचे स्थान मिळवणारा सातवा संघ ‘सुपर ७’ फेरीत प्रवेश करतील. थोडक्यात सांगायचे तर, विजेतेपदाच्या शर्यतीत एकूण सात संघ कायम राहतील.

सुपर-७ फेरी अजून रोमांचक होणार

या दोन टप्प्यांनंतर ‘सुपर ७’ सामने सुरू होतील. यात प्रत्येक संघ इतर सर्व संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल, म्हणजेच प्रत्येक संघाला एकूण सहा सामने खेळावे लागतील. त्यानंतर, गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर ‘नॉकआउट’ फेरीला सुरुवात होईल. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेला संघ चौथ्या स्थानावरील संघाशी, तर दुसऱ्या स्थानावरील संघ तिसऱ्या स्थानावरील संघाशी खेळेल; असे हे दोन उपांत्य सामने असतील. या सामन्यांमधील विजेते संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

फायनल गाठणाऱ्या संघाला खेळावे लागणार १३ सामने

विश्वचषकाचा प्रवास १४ संघांसह सुरू होणार आहे; अंतिम सामन्यासाठी दोन संघ पोहोचेपर्यंत इतर संघ एकामागून एक बाद होत जातील. विजेत्या संघाला गट फेरीपासून ते अंतिम सामन्यापर्यंत किमान १३ सामने खेळावे लागतील; यामध्ये पाच गट सामने, सहा ‘सुपर ७’ सामने, एक उपांत्य सामना आणि मग अंतिम सामना यांचा समावेश असेल.

आता प्रश्न असा पडतो की, हा विश्वचषक २०२३ मध्ये झालेल्या मागील विश्वचषकापेक्षा कसा वेगळा असेल? यातला सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे सहभागी संघांची संख्या १० वरून १४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ एकच गट टप्पा (league stage) होता, परंतु आता या रचनेत बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेची चुरस वाढवण्यासाठी ‘सुपर सिरीज’ (Super Series) सुरू करण्यात आली आहे आणि यात ‘सुपर ७’ (Super 7) हा टप्पाही समाविष्ट करण्यात आला आहे.