२०२१ साली खेळवण्यात येणारी प्रस्तावित चॅम्पियन्स ट्रॉफी टी-२० प्रकारात खेळवण्याचा प्रस्ताव आयसीसीने आपल्याशी संलग्न देशांसमोर ठेवला आहे. १९९८ साली सुरु झालेल्या या स्पर्धेला आयसीसीच्या वार्षिक वेळापत्रकामध्ये मोठं महत्व आहे. २०२१ साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचे हक्क भारताला देण्यात आलेले आहेत. मात्र २०१३ व २०१७ साली इंग्लंडमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत झालेलं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी व भविष्यात स्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळण्यासाठी आयसीसीने टी-२० सामने भरवण्याचा प्रस्ताव दिल्याचं समजतं आहे.

मध्यंतरीच्या काळात करसवलतीच्या मुद्द्यावरुन आयसीसीने २०२१ साली होणारी ही स्पर्धा भारताबाहेर नेण्याची तयारी सुरु केली होती. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीतले सामने टी-२० प्रकारात खेळण्यासाठी बीसीसीआयने स्पष्ट नकार दिलेला आहे. भविष्यात आयसीसीकडून या स्पर्धेचं स्वरुप बदलण्याचा प्रयत्न झाल्यास बीसीसीआय त्याला ठामपणे विरोध करेलं असं एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर स्पष्ट केलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु करण्यात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा महत्वाचा वाटा होता. त्यामुळे दालमिया यांच्या स्मरणार्थ बीसीसीायने २०२१ साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्याचं निश्चीत केल्याचं समजतंय. त्यामुळे आयसीसी आणि बीसीसीआयच्या या शीतयुद्धात नेमकं कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.