ICC T20 Rankings After World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ दणक्यात पार पडला. यजमान भारताने या स्पर्धेचं जेतेपद पटकावत इतिहास घडवला. या स्पर्धेत अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळाले. शतकं, ५ विकेट्स, हॅटट्रिक, जलद अर्धशतकांसह अनेक विक्रम खेळाडूंने मोडले. या टी-२० विश्वचषकानंतर आयसीसीने नवी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा मोठा दबदबा पाहायला मिळत आहे.

टीम इंडियाच्या फलंदाजांचा पुन्हा एकदा आयसीसी क्रमवारीत जलवा पाहायला मिळत आहे. इशान किशनने या क्रमवारीत मोठी झेप घेत थेट दुसरं स्थान गाठलं आहे. आता, अभिषेक शर्माचे पहिलं स्थान यामुळे धोक्यात आलं आहे. संजू सॅमसनलाही त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे पुनरागमन करण्यात यश आलं आहे, तर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांची मात्र काही स्थानांनी घसरण झाली आहे.

अभिषेक शर्माचं जगातील नंबर वन टी-२० फलंदाजाचं स्थान धोक्यात

२०२६ च्या टी-२० विश्वचषकानंतर आयसीसीने नवीन टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. अभिषेक शर्मा क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज राहिला आहे. पण, आता त्याचं स्थान धोक्यात आलं आहे, कारण आता पहिल्या क्रमांकाच्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजांमधील रेटिंगमध्ये फारसं अंतर राहिलेलं नाही. अभिषेक शर्माचं रेटिंग ८७५ आहे. त्याच्या पाठोपाठ इशान किशनचा क्रमांक लागतो, ज्याने यावेळी दोन स्थानांनी झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग ८७१ पर्यंत वाढलं आहे. याचा अर्थ पहिल्या क्रमांकाच्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजांमध्ये फक्त चार गुणांचे अंतर आहे.

पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान एका स्थानाने घसरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, सध्या त्याचं रेटिंग ८४८ आहे. इंग्लंडचा फिल सॉल्टही एका स्थानाने घसरला आहे. तो ७९२ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा पथुम निसांका पाचव्या क्रमांकावर कायम आहे. न्यूझीलंडचा टिम सेफर्टने यावेळी मोठी झेप घेतली. तो चार स्थानांनी पुढे सरकला आहे आणि त्याचे रेटिंग ७४९ आहे. भारताचा तिलक वर्मा देखील यावेळी एक स्थान घसरून ७व्या क्रमांकावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेव्हिस ८ व्या क्रमांकावर आहे.

ICC Rankings after T20 World Cup 2026
आयसीसी टी-20 क्रमवारी

भारताचा टी-२० वर्ल्डकप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव देखील दोन स्थानांनी घसरून ७२२ च्या रेटिंगसह नवव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा जोस बटलर ७१६ च्या रेटिंगसह दहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरलेल्या संजू सॅमसनने यावेळी, १८ स्थानांनी झेप घेत २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात संजूने शेवटच्या तीन सामन्यांमध्ये वादळी खेळी केल्या, ज्याचा परिणाम रँकिंगमध्ये दिसून येत आहे.