पीटीआय, नवी दिल्ली

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेशचे सामने भारताबाहेर हलविण्यास नकार देताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच होणार असल्याचे जाहीर केले होते. ‘आयसीसी’च्या या निर्णयाविरोधात बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) ‘आयसीसी’च्या तक्रार निवारण समितीकडे (डीआरसी) धाव घेतली, पण हा विषय ‘डीआरसी’च्या कार्यकक्षेबाहेर असल्याने या अपिलावर सुनावणी होणार नाही. त्यामुळे बांगलादेशचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले असून, आता विश्वचषकात त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश होण्याची शक्यता आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आज, शनिवारी केली जाऊ शकते.

अमिनुल इस्लाम बुलबुल यांच्या नेतृत्वाखालील ‘बीसीबी’ने शेवटचा पर्याय म्हणून ‘डीआरसी’कडे दाद मागितली. मात्र ‘आयसीसी’च्या घटनेनुसार, ‘डीआरसी’ला ‘आयसीसी’च्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाविरोधात अपील ऐकण्याचा अधिकार नाही. “बीसीबीने डीआरसीकडे अर्ज केला आहे. त्यांना सर्व मार्ग वापरून बघायचे आहेत. डीआरसीने नकार दिल्यास, बांगलादेशकडे फक्त स्वित्झर्लंडमधील क्रीडा लवाद (सीएएस) हाच पर्याय उरेल,” असे ‘बीसीबी’तील एका सूत्राने सांगितले. ‘आयसीसी’ने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम बदलण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेश क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सल्लागार आसिफ नझरुल, बांगलादेशचे अंतरिम सरकार आणि राष्ट्रीय संघातील खेळाडूंची गुरुवारी बैठक झाली.

त्यानंतर नझरुल यांनी ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ बांगलादेश संघ भारतात जाणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याच्या आदल्या दिवशी ‘आयसीसी’च्या संचालक मंडळाने स्वतंत्र सुरक्षा मूल्यमापनानंतर १४–२ अशा मतांनी बांगलादेशचे सामने भारतातच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्या अहवालात बांगलादेश संघाला भारतात सुरक्षा धोका ‘कमी ते मध्यम’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘आयसीसी’ अध्यक्ष जय शहा सध्या दुबईत असून बांगलादेशच्या जागी कोणत्या संघाचा समावेश होणार याबाबतचा अंतिम निर्णय शनिवारी जाहीर केला जाईल. बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्यास त्यांच्या जागी क्रमवारीनुसार स्कॉटलंडचा समावेश करण्याचा निर्णय ‘आयसीसी’च्या नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आता स्कॉटलंडला विश्वचषकात खेळण्याची संधी लाभू शकेल.

‘आयसीसी’ची नाराजी बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठविणार नसल्याचा पुनरुच्चार गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केला होता. मात्र, ‘आयसीसी’शी अधिकृत संवाद साधण्यापूर्वीच पत्रकार परिषद घेण्यात आल्यामुळे ‘आयसीसी’तील सदस्य नाराज असल्याचेही समजते. ‘आयसीसी’च्या तक्रार निवारण समितीला (डीआरसी) ‘आयसीसी’ने घेतलेल्या निर्णयाविरोधात अपील ऐकण्याची परवानगी नाही. कोणताही निर्णय घेताना ‘आयसीसी’च्या नियामक मंडळाने नियमांचे पालन केले आहे की नाही, याची तपासणी करणे एवढीच ‘डीआरसी’ची भूमिका आहे.