T20 World Cup 2026 Semi Final Rules: टी-२० विश्वचषक २०२६च्या सेमीफायनलचे ४ संघ ठरले आहेत. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत यांच्यात सेमीफायनल खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ४ मार्च म्हणजेच आज कोलकातामध्ये खेळवला जात आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ मार्चला मुंबईत होणार आहे. आयसीसीचे या सेमीफायनलसाठी काय नियम असणार आहेत, जाणून घेऊया.

टी-२० विश्वचषक २०२६ मधील दोन्ही सेमीफायनलसाठी व फायनलसाठी राखीव दिवस आयसीसीकडून ठेवण्यात आला आहे. जर सेमीफायनल सामना नियोजित तारखेला, वेळेला किंवा राखीव दिवशी पूर्ण झाल्यास निकाल मिळेलचं, पण जर असं झालं नाही, तर सेमीफायनल सामन्याचा निकाल मिळवण्यासाठी सामन्यात किती षटकं खेळवावी लागतील?

टी-२० विश्वचषकासाठी काय आहेत आयसीसीचे नियम?

टी-२० विश्वचषकातील सेमीफायनल सामन्याचा संपूर्ण रोमांच अनुभवण्यासाठी २०-२० षटकांचा सामना व्हावा, अशी सर्वच चाहत्यांची इच्छा असेल. पण पाऊस, हवामान आणि इतर कोणत्याही कारणांमुळे जर सामना होऊ शकला नाही तर आयसीसीच्या नियमानुसार कमीत कमी १०-१० षटकांता सामना खेळवणं गरजेचं आहे.

उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण जर सेमीफायनलच्या नियोजित दिवशी १० षटकांचा खेळ झाला नाही तर सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. पण सामन्याच्या दिवशी १० षटकांचा सामना होईल असा पंचांचा पूर्ण प्रयत्न असेल. सामन्यादिवशी ९० मिनिटांचा आणि राखीव दिवशी १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. पण, जर राखीव दिवशी किमान १० षटकांचा सामना झाला नाही तर सामना रद्द केला जाईल. यासह सुपर ८ गटात अव्वल स्थान मिळवणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

जर सामना रद्द झाला तर त्याचा फायदा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला होईल, कारण दोन्ही संघ आपापल्या गटात अव्वल स्थानावर राहिले आहेत. सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिका अ गटातून अव्वल स्थानी आहे, तर इंग्लंड ब गटातून अव्वल स्थानी आहे. त्यामुळे न्यूझीलंड आणि भारतासाठी सामना न होणं ही वाईट बातमी असणार आहे.

टी-२० विश्वचषकातील सेमीफायनल आणि फायनल सामने संध्याकाळी ७ वाजता खेळवले जातील. अंतिम सामना ८ मार्च रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. सेमीफायनल व फायनलचे सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि मोबाईल जिओहॉटस्टार या अॅपवर लाईव्ह पाहता येणार आहे. यंदा टी-२० मधील नवा चॅम्पियन मिळणार की भारतीय संघ इतिहास घडवणार यावर सर्वांच्या नजरा असतील.