ICC warns Pakistan of implications: टी-२० विश्वचषक २०२६ अवघ्या ६ दिवसांवर आलेला असताना पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला. सरकारने पाकिस्तान संघाला १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात खेळू नये, असे निर्देश दिले आहेत. मात्र, पाकिस्तानच्या स्पर्धेतील सहभागाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्पर्धेच्या योजनांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) त्यावर नाराज आहे. ICC ने गंभीर परिणामांचा इशारा दिला असून PCB ला त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलं आहे.
पाकिस्तान सरकारने एका निवेदनात म्हटलं, “पाकिस्तान सरकार आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाला मंजुरी देते. मात्र, १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध नियोजित सामन्यात पाकिस्तान संघ मैदानात उतरणार नाही.” हा निर्णय संघ श्रीलंकेला रवाना होण्याच्या काही तास आधी घेण्यात आला. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ संपूर्ण कालावधीत श्रीलंकेतच असणार आहे.
भारताविरुद्ध टी-२० वर्ल्डकप सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कार
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अद्याप या निर्णयाची अधिकृत माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) दिलेली नाही. मात्र, सायंकाळी जारी केलेल्या निवेदनात आयसीसीने इशारा देत म्हटलं की, “एका संघाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराच्या सोयीस्कर वागण्यामुळे खेळभावनेला ठेच पोहोचते आणि स्पर्धेचं निकोप वातावरणही बिघडतं,” असं आयसीसीने म्हटलं आहे.
“पीसीबीकडून अधिकृत पत्रव्यवहाराची प्रतीक्षा असतानाही, निवडक सहभागाची ही भूमिका जागतिक क्रीडा स्पर्धेच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत नाही. पात्र ठरलेले सर्व संघ समान अटींवर स्पर्धेत सहभागी होती, हीच अशा स्पर्धेची संकल्पना आहे,” असं आयसीसीने स्पष्ट केलं.
पुढे आयसीसीने म्हटलं, “या निर्णयाचे पाकिस्तानमधील क्रिकेटवर होणारे दीर्घकालीन परिणाम पीसीबीने लक्षात घ्यावेत, अशी अपेक्षा आहे. कारण याचा परिणाम जागतिक क्रिकेट व्यवस्थेवरही होऊ शकतो, ज्याचा पीसीबी स्वतः सदस्य आहे. राष्ट्रीय धोरणांमध्ये सरकारची भूमिका आयसीसी मान्य करते, मात्र हा निर्णय जागतिक क्रिकेट किंवा जगभरातील चाहत्यांच्या त्यात पाकिस्तानमधील कोट्यवधी चाहत्यांच्याही हिताचा नाही.”
“आयसीसीचे प्रमुख उद्दिष्ट पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाचे यशस्वी आयोजन आहे आणि त्याची जबाबदारी पीसीबीसह सर्व सदस्यांची आहे. त्यामुळे सर्व संबंधित घटकांचे हित जपेल असा परस्परसंमतीने तोडगा काढण्याचा मार्ग पीसीबीने शोधावा, अशी अपेक्षा आयसीसीने व्यक्त करत आहे,” असं निवेदनात नमूद करण्यात आलं.
पाकिस्तानच्या या निर्णयाचा मैदानावर आणि मैदानाबाहेरही गंभीर परिणाम होणार आहे. एका सामन्यासाठी तब्बल १३८.७ कोटी रुपये मोजणाऱ्या प्रसारकाला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. भारत-पाकिस्तान सामना हा सर्वाधिक उत्सुकतेने पाहिला जाणारा सामना मानला जातो. या लढतीला विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळते आणि जाहिरातींमधून सर्वाधिक महसूलही याच सामन्यातून मिळतो.
जर पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहिला, तर त्यांना गट टप्प्यातील उर्वरित तीनही सामने—नेदरलँड्स, अमेरिका आणि नामिबिया जिंकणं अनिवार्य ठरणार आहे. कारण भारताविरुद्ध न खेळल्यास पाकिस्तानला दोन गुण गमवावे लागतील, शिवाय त्यांचा नेट रनरेटही घसरू शकतो. अशा परिस्थितीत लवकर स्पर्धेबाहेर पडण्याचा धोका पाकिस्तानसमोर उभा राहील.

