भारत-न्यूझीलंड आणि बांगलादेश-पाकिस्तान टी-२० मालिकेनंतर आयसीसीने नवीनतम क्रमवारी जाहीर केली आहे. सांघिक क्रमवारीत भारत दुसऱ्या, पाकिस्तान तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या आणि बांगलादेश आठव्या स्थानावर आहे. इंग्लंड संघ पहिल्या स्थानावर आहे. फलंदाजांमध्ये भारताचे टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली टॉप-१०मधून बाहेर पडला आहे. तो आता ११व्या स्थानी आहे. रोहित शर्मा १३ व्या तर सूर्यकुमार यादव ५९व्या स्थानावर पोहोचला आहे. कामाच्या व्यवस्थापनामुळे विराट न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका खेळू शकला नाही, तो ब्रेकवर होता.

बाबर आझम फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे, पण त्याचे ३० गुणांचे नुकसान झाले आहे. मोहम्मद रिझवान एक स्थानाने पुढे जात चौथ्या तर केएल राहुल एका स्थानाने प्रगती करत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल तीन स्थानांनी पुढे जात १०व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा फखर जमान ३५व्या स्थानावर आहे.

हेही वाचा – बधाई हो..! भारताचा ‘स्टार’ क्रिकेटर बनला ‘बाबा’; नुकतीच गाजवलीय न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका!

गोलंदाजी क्रमवारीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा मिचेल सँटनर १० स्थानांनी प्रगती करत १३व्या, भारताचा भुवनेश्वर कुमार १९व्या आणि दीपक ४०व्या स्थानावर आहे. बांगलादेशचा महेदी हसन सहा स्थानांनी प्रगती करत १२व्या आणि शरीफुल इस्लाम तीन स्थानांनी प्रगती करत ४०व्या स्थानी आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत मोहम्मद नबी पहिल्या स्थानावर कायम आहे, तर शाकिब अल हसन दुसऱ्या स्थानावर आहे. भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा एकही खेळाडू पहिल्या दहामध्ये नाही.