पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने भारतीय संघावर टीका करणारा पाकिस्तान संघाचा हंगामी प्रशिक्षक अब्दुल रझ्झाकला सणसणीत टोला लगावला आहे. अब्दुल रझ्झाकने पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारची गुणवत्ता आहे, ती अतुलनीय आहे. अशी गुणवत्ता भारतीय क्रिकेट संघात नाही, असं मत व्यक्त केलं होतं. मात्र आता कनेरियाने हे वक्तव्य फेटाळून लावत कठोर शब्दात रझ्झाकचा समाचार घेतलाय. खरं तर भारत आणि पकिस्तानमध्ये तुलना होऊ शकत नाही असं सांगताना रझ्झाकचं वक्तव्य हे वायफळ बडबड म्हणजेच बकवास आहे असंही कनेरिया म्हणालाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानच्या माजी फिरकीपटूने पाकिस्तानचा सध्याचा संघ चांगला आहे असं आपल्याला वाटत नसल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. इतकच नाही तर भारताविरोधात वक्तव्य करुन बढाया मारणाऱ्या रझ्झाकला कनेरियाने याच वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या इंग्लंड दौऱ्याबद्दलही आठवण करुन दिलीय. कनेरियाने आपल्या युट्यूब चॅनेलवरील एका व्हिडीओमध्ये रझ्झाकच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय.

बकवास वक्तव्य
“पाकिस्तानची फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये स्थैर्य नाहीय. रझ्जाकने कोहली आणि रोहितला बाद केल्यानंतर भारतीय संघाला हरवणं सोप्प असल्याचं म्हटलं आहे. हे बकवास वक्तव्य आहे. असं केल्याने तुम्ही भारतीय संघाला कसं हरवणार आहात? पाकिस्तानला संघ बनवतानाच अडचणी येत आहेत. तुमच्या संघाची फलंदाजी तरी ठीक आहे का याचा आधी विचार करा आणि मग जिंकण्याचा गोष्टी करा. इंग्लंडच्या बी टीमने आपल्याला पराभूत केलंय. आपण निवड करताना चूक करतो. रझ्झाकचं वक्तव्य फारच चुकीचं आहे,” असं कनेरिया म्हणालाय.

त्यांना तुम्ही कसं बाद करणार आहात?
ज्या खेळाडूला पाकिस्तानमध्ये फार सन्मान दिला जातो त्याने अशा पद्धतीची वक्तव्य करु नयेत. भारतीय संघामध्ये अगदी तळापर्यंत फलंदाज आहेत. हा संघ फारच चांगला असल्याने पाकिस्तानवर दबाव असल्याचं मतही कनेरियाने व्यक्त केलं. पाकिस्तानने भारताला ५० षटकांच्या तसेच २० षटकांच्या विश्वचषक सामन्यांमध्ये एकदाही पराभूत केलेलं नाही, याकडेही त्याने लक्ष वेधलं. “पाकिस्तानमध्ये सन्मान मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूकडून अशाप्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. भारत प्रत्येक बाबतीत चांगली कामगिरी करत आहे. त्यांच्याकडे सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पांड्यासारखे खेळाडू आहेत, त्यांना तुम्ही कसं बाद करणार आहात?” असा प्रश्न कनेरियाने रझ्झाकला विचारलाय.

रझ्झाक म्हणालेला की, भारताकडे गुणवत्ता नाही
अब्दुल रझ्झाक एका वृत्तसंस्शेला मुलाखत देताना भारतात गुणवत्ता नसल्याचं म्हटलं होतं. “भारत पाकिस्तानशी स्पर्धा करू शकेल असे मला वाटत नाही. पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारची प्रतिभा आहे, ती पूर्णपणे वेगळी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने न होणं हे क्रिकेटसाठी चांगलं नाहीय. खेळाडूंना ते किती दबाव हाताळू शकतात हे दाखवण्याची संधी अशा सामन्यांमधून मिळते. पण या दोघांत सामने झाले असते तर त्यावरून पाकिस्तानकडे किती गुणवत्ता आहे आणि भारताकडे तिचा असणारा अभाव लगेच दिसून आला असता,” असं रझ्झाक म्हणालेला.

भारत-पाकिस्तान सामन्यांची आकडेवारी काय सांगते?
भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान शेवटचा टी २० सामना २०१६ मध्ये टी २० विश्वचषकादरम्यान खेळवण्यात आला होता. कोलकात्यामध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने सहा गडी राखून विजय मिळवला होता. कट्टर प्रतिस्पर्धी असणारे हे दोन्ही संघ आतापर्यंत टी २० विश्वचषकामध्ये पाच वेळा आमने-सामने आलेत. हे पाचही सामने भारताने जिंकलेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण ८ टी-२० सामने झाले असून त्यापैकी ७ भारताने जिंकलेत. पाकिस्ताने केवळ एकदाच भारताला पराभूत केलंय. पाकिस्तानला मिळालेला हा एकमेव विजय डिसेंबर २०१२ रोजी बेंगळुरुमधील मैदानात खेळताना मिळाला होता. पाकिस्तानने हा सामना पाच गडी राखून जिंकला होता. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी २० असं सर्व काही गृहित धरल्यास आतापर्यंत भारत पाकिस्तानमध्ये १७ सामने झाले असून त्यापैकी १४ सामने भारताने जिंकलेत.

ओमान आणि यूएईमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc t20 world cup 2021 danish kaneria slams abdul razzaq over his india vs pakistan comment scsg
First published on: 07-10-2021 at 17:30 IST