ओमान आणि यूएईमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी सर्व देशांचे संघ जाहीर करण्यात आलेले असतानाच पाकिस्तानने आपल्या संघामध्ये तीन मुख्य बदल केले आहेत. पाकिस्तानी संघात हैदर अली, सरफराज अहमद आणि फखर जमानला स्थान देण्यात आलं आहे. ४ सप्टेंबरला घोषित केलेल्या आधीच्या संघात पाकिस्तान लीगमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानने ज्या पद्धतीने निर्णय घेतलाय तसाच निर्णय भारताकडूनही घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या यूएईमध्ये सुरु असणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या आधारे १५ जणांच्या संघामध्ये काही महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे या बदलांमध्ये मुंबई इंडियन्सच्याच तीन खेळाडूंबद्दल फेरविचार केला जाण्याची शक्यता आहे. आज याचसंदर्भातील एक महत्वाची बैठक पार पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानने काय बदल केले?
पाकिस्तानी संघामध्ये सरफराज अहमद आणि हैदर अली यांनी आझम खान आणि मोहम्मद हसनैन यांची जागा घेतली आहे. तर फखर जमानला राखीव खेळाडू म्हणून सहभागी केलं आहे. त्याला खुशदिल शाहच्या जागेवर घेण्यात आलं आहे.

आज भारतीय संघासंदर्भातही महत्वाची बैठक
शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि राष्ट्रीय निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भारतीय संघात बदल करण्याविषयी बैठक होणार आहे. या बैठकीत हार्दिक पंड्याची गोलंदाजी आणि इशान किशन, राहुल चहर यांची कामगिरी या मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा केली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

निवड केलेल्या खेळाडूंवरच विश्वास दाखवणार की…
संयुक्त अरब अमिराती येथे १७ ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रणधुमाळीला प्रारंभ होणार असून यासाठी भारताचा १५ सदस्यीय संघ (अधिक तीन राखीव खेळाडू) महिन्याभरापूर्वीच जाहीर करण्यात आला. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) १० ऑक्टोबरपर्यंत सर्वांना अंतिम संघात बदल करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे ‘आयपीएल’मधील साखळी सामन्यांचा आढावा घेत निवड समिती भारतीय संघात काही बदल करणार की यापूर्वी निवड केलेल्या खेळाडूंवरच विश्वास दाखवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कोणाला स्थान मिळण्याची शक्यता?
हार्दिक, किशन आणि चहर हे तिघेही ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतात. परंतु त्यांना स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात चमक दाखवता न आल्याने मुंबईची कामगिरीसुद्धा आपोआप खालावली. विशेषत: हार्दिकने पाठीच्या दुखापतीमुळे अद्याप एकाही लढतीत गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे विश्वचषकात भारताला वेगवान अष्टपैलूची उणीव भासू शकते. हार्दिक हा एकमेव अष्टपैलू खेळाडू भारताच्या चमूमध्ये. त्यामुळेच तो गोलंदाजी करु शकणार नसेल तर त्याचा फारसा काही उपयोग संघाला होणार नाही असं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळेच हार्दिकबद्दल कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा स्थितीत राखीव खेळाडूंमध्ये असलेल्या शार्दूल ठाकूर (१८ बळी) किंवा दीपक चहर (१३ बळी) यांच्यापैकी एकाला मुख्य संघात स्थान मिळू शकते.

इशान किशनऐवजी श्रेयस अय्यरला स्थान?
डावखुरा युवा फलंदाज इशान किशनला सुमार कामगिरीमुळे मुंबईच्या संघातून काही सामन्यांसाठी वगळण्यातही आले. राजस्थानविरुद्धच्या साखळी सामन्यात अर्धशतक झळकावून त्याने सूर गवसल्याचे संकेत दिले. साखळी सामन्यांतील शेवटच्या सामन्यात इशानने ३२ चेंडूत ८४ धावा करत आपली दावेदारी सिद्ध केली असून या खेळीच्या जोरावर त्याचं स्थान कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी शेवटच्या दोन खेळी वगळल्यास इशानची कामगिरी सुमार राहिलीय. अमिरातीतील संथ खेळपट्टीवर इशान कितपत यशस्वी होईल, हे खात्रीने सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या मुंबईकर श्रेयस अय्यरला मुख्य संघात स्थान देण्याचा पर्याय निवड समितीपुढे उपलब्ध आहे. संयमी श्रेयसचे पुनरागमन झाल्यापासून दिल्लीची मधली फळी अधिक बळकट झाली आहे.

चहर आऊट चहल इन?
तिसरा मुद्दा म्हणजे फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलला डावलून चहरला दिलेले प्राधान्य. अमिरातीतील खेळपट्ट्यांवर गतीने चेंडू फिरवणाऱ्या खेळाडूला निवडण्याच्या उद्देशाने चहरला संघात स्थान देण्यात आले. मात्र ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यातील चार लढतींमध्ये चहरने फक्त दोन बळी मिळवल्याने त्याने मुंबईच्या संघातील स्थान गमावले. त्याउलट चहलने बेंगळूरुसाठी सहा सामन्यांत ११ बळी पटकावले.

सध्या निवडण्यात आलेला भारतीय संघ

’  फलंदाज : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव

’  यष्टीरक्षक : ऋषभ पंत, ईशान किशन

’  अष्टपैलू : हार्दिक पंडय़ा

’  वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

’  फिरकीपटू : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर

’  राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc t20 world cup 2021 pakistan make changes to initial squad add 3 new players will india also reconsider the same scsg
First published on: 09-10-2021 at 09:18 IST