भारताविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “Please, मी तुम्हाला…”

कर्णधार बाबर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

babar azam
पाकिस्तानने कोणताही टी २० सामना १० गडी राखून जिंकण्याची ही पहिलीच वेळ (फोटो ट्विटरवरुन साभार)

भारत पाकिस्तान सामन्या म्हटल्यावर तो रोमहर्षक होईल ही अपेक्षा रविवारी फोल ठरली आणि कोट्यावधी भारतीयांची निराशा झाली. आधी फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. भारताच्या या पराभावाला कारणीभूत ठरले ती पाकिस्तानी खेळाडू डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम. मात्र या ऐतिहासिक विजयानंतर बाबर आझमने संघाला एक इशारा दिलाय.

भारतीय डावात काय घडलं
भारतीय संघाची फलंदाजी या सामन्यामध्ये ढेपाळल्याचं पहायला मिळालं. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. विराट कोहली आणि ऋषभ पंत वगळता कोणत्याही खेळाडूला या सामन्यात आपल्यचा फलंदाजीची जादू दाखवता आली नाही. भारताचा कर्णधार विराट कोहलीचे (५७) झुंजार अर्धशतक व्यर्थ ठरले. प्रथम फलंदाजी करताना भारताला २० षटकांत ७ बाद १५१ धावाच करता आल्या.

रोहित शर्मा (०) आणि के. एल. राहुल (३) या सलामीच्या जोडीला शाहीनने स्वस्तात माघारी पाठवले. तसेच सूर्यकुमार यादवही (११) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यानंतर मात्र कोहली (५७) आणि ऋषभ पंत (३९) यांनी पडझड थांबवली. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी ५३ धावांची भागीदारी रचल्यावर फिरकीपटू शादाब खानने ऋषभला बाद केले. कोहलीने ४९ चेंडूत ५७ धावांची खेळी केल्यावर त्याला शाहीननेच माघारी धाडले. कोहलीला साथ देण्यासाठी आलेले रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या यांनाही काही विशेष कामगिरी करता आली नाही.

पाकिस्तानचा दबदबा
दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.

रिझवान आणि आझम या भरवशाच्या सलामीवीरांनी या वर्षांतील चौथी शतकी भागीदारी रचत विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानला पाहिल्यांच भारताविरुद्ध विजय मिळवून दिला. पहिल्यांदाच पाकिस्तानने कोणताही टी २० सामना १० विकेट्सने जिंकला.

बाबर म्हणाला, “प्लिज…”
या सामन्यानंतर संघाला मार्गदर्शन करताना कर्णधार बाबरने त्यांना विजयामुळे हुरळून न जाण्याचा सल्ला दिलाय. “या विजयानंतर आपण निश्चिंत राहणं आपल्याला परवडणारं नाही. गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा श्रेत्ररक्षण असो आपल्याला आपली १०० टक्के कामगिरी करायची आहे. एक संघ म्हणून आपण हा सामना जिंकलोय. आपण हा विजय आपल्या कुटुंबाबरोर नक्कीच साजरा करु पण यामुळे अगदी हुरळून जाता कामा नये,” असं बाबर म्हणाला. इतकच नाही तर खेळाडूंना अगदी गयावया करुन प्लिज म्हणत त्याने हूरळून न जाण्याचं आवाहन केलं. “प्लिज, मी तुम्हाला यासाठी विनंती करतोय असं समजा हवं तर. आपण आपल्या ध्येयापासून भटकता कामा नये,” असं बाबरने संघ सहकाऱ्यांना सांगितलं आहे.

पुढचा सामना न्यूझीलंडविरोधात
सामन्यामधील पहिल्या डावात भन्नाट गोलंदाजी केल्यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली आहे. आता पाकिस्तानचा पुढील सामना न्यूझीलंडशी होणार आहे तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी भारत न्यूझीलंडविरोधात मैदानात उतरेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Icc t20 world cup 2021 pakistan skipper babar azam makes big statement after win against india scsg

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या