अल अमेरात : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे बिगूल रविवारी वाजणार असून प्राथमिक फेरीच्या दोन सामन्यांनी या स्पर्धेला प्रारंभ होईल. या स्पर्धेचे सह-आयोजक ओमानचा सामना पापुआ न्यू गिनीशी (पीएनजी), तर बांगलादेशचा सामना स्कॉटलंडशी होणार आहे.

असद वालाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ‘पीएनजी’ संघाला यंदा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात यश आले. परंतु त्यांना स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच काही आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. ‘पीएनजी’मध्ये करोनाचा उद्रेक झाला असून काही खेळाडूंनाही या विषाणूची बाधा झाली. कर्णधार वालाच्या अष्टपैलू खेळावर हा संघ अवलंबून आहे. दुसरीकडे, पाच वर्षांपूर्वी आर्यलडवर मात करत ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरणाऱ्या ओमानला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होऊ शकेल.

दुसऱ्या लढतीत, स्कॉटलंडविरुद्ध बांगलादेशचे पारडे जड मानले जात आहे. बांगलादेशने या वर्षांत नऊ ट्वेन्टी-२० विजयांची नोंद केली असून झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांना पराभूत केले. या संघात कर्णधार महमदुल्ला, अष्टपैलू शाकिब अल हसन, यष्टीरक्षक-फलंदाज मुशफिकूर रहीम आणि वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमान यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.

त्यांना स्कॉटलंडचा संघ चांगली झुंज देईल अशी अपेक्षा आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळण्याची ही स्कॉटलंडची चौथी वेळ आहे. कर्णधार कायेल कॉट्झर, कॅलम मक्लोड, रिची बेरिंग्टन यांच्यावर फलंदाजीची भिस्त असून गोलंदाजीत ब्रॅड व्हेल आणि जोश डेव्ही हे महत्त्वाची भूमिका बजावतील.

आजचे सामने

ओमान वि. पापुआ न्यू गिनी

’ वेळ : दुपारी ३.३० वा.

बांगलादेश वि. स्कॉटलंड

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)