ICC T20 World Cup 2021: सुनील गावस्कर यांनी निवडला संघ; धवन, अय्यरला स्थान नाही तर ओपनर म्हणून रोहितसोबत…

टी-२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंच्या संघामध्ये कोणाला स्थान मिळणार आणि कोणाला नाही याबद्दल क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.

ICC T20 World Cup 2021
गावस्कर यांनी निवडलेल्या संघात १५ खेळाडू (प्रातिनिधिक फोटो)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून टी-२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाची आज घोषणा करणार आहे. नियमांनुसार १० सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या संघांना १५ जणांचा चमूची यादी जाहीर करावी लागणार आहे. त्यानुसार आज किंवा उद्यापर्यंत बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा होईल असं सांगितलं जात आहे. मात्र असं असलं तरी संघामध्ये कोणाला स्थान मिळणार आणि कोणाला नाही याबद्दल क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. त्यातच भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनिल गावस्कर यांनी या स्पर्धेसाठी त्यांच्या मते कोणता संघ पाठवला पाहिजे याबद्दलची यादीच जाहीर केलीय. मात्र गावस्कर यांनी निवडलेला संघ पाहून चाहत्यांना धक्का बसलाय. गावस्कर यांनी आपल्या संघात के. एल. राहुलला सलामीवीर म्हणून निवडलेलं नाही. त्यांनी रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून राहुलऐवजी इतर खेळाडूच्या नावाचा सल्ला दिलाय. विशेष म्हणजे गावस्कर यांनी निवडलेल्या १५ खेळाडूंच्या संघात शिखर धवन आणि श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलेलं नाही.

नक्की पाहा हे फोटो >> आईच्या भीतीपोटी लागलेल्या सवयीमुळे बुमरा आज झालाय ‘यॉर्कर किंग’

सलामीला रोहित आणि…

गावस्कर हे त्यांच्या क्रिकेटबद्दलच्या ज्ञानासाठी आणि अचूक अंदाजांसाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांनी राहुलची निवड न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. त्यांनी राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा सल्ला देत कर्णधार विराट कोहलीने सलामीला फलंदाजी करावी असं म्हटलं आहे. गावस्कर यांनी तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. मागील काही महिन्यांपासून सूर्यकुमारने त्याच्या फलंदाजीने अनेकांना प्रभावित केलं असून इंग्लडविरोधातील मालिकेत सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केलं आहे. ४६.३३ च्या सरासरीने त्याने या मालिकेत १३९ धावा केल्यात. एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमारने ६२.०० च्या सरासरीने धावा केल्यात. सूर्यकुमार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. तो तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर फलंदाजीला येऊ शकतो. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी के. एल राहुलची निवड गावस्कर यांनी आपल्या संघात केलीय. सध्या राहुल हा टी २० मधील आघाडीचा खेळाडू आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : बुमराच्या घातक यॉर्करमागील तंत्र; कोणत्याही फलंदाजाला क्रीज टीकून राहणंही का होतं मुश्कील?

पाचव्या क्रमांकावर कोण?

राहुलने सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली असली तरी तो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही चांगला खेळतो. त्याने सलामीवीर म्हणून यावं असं अनेक चाहत्यांना वाटत असलं तरी मधल्या फळीमध्ये राहुलने खेळावं असं गावस्कर म्हणतात. पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या किंवा ऋषभ पंतला फलंदाजीला पाठवता येईल असं गावस्कर यांचं म्हणणं आहे.

अष्टपैलू खेळाडू म्हणून कोणाला निवडलं?

अष्टपैलू खेळाडू म्हणून गावस्कर यांनी वॉशिंग्टन सुंदरची (त्याची प्रकृती ठीक असेल आणि तो सामन्यासाठी फीट असेल तर) निवड केलीय. तसेच त्यांनी क्रृणाल पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनाही आपल्या संघात स्थान दिलं आहे. स्पोर्ट्स तकशी बोलताना गावस्कर यांनी, “मी क्रृणालला निवडले कारण तो अनुभवी आहे. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलीय. तसेच तो डाव्या हाताचा खेळाडू असल्याने संघाला फायदा होईल,” असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “लंच ब्रेकनंतर बुमरा माझ्याकडे आला आणि म्हणाला…”; सामन्याला कलाटणी देणाऱ्या त्या क्षणाबद्दल विराटचा खुलासा

कोणाला वगळलं?

गावस्कर यांनी जलदगती गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहरची निवड केलीय. तसेच गावस्कर यांनी शार्दूल ठाकुरलाही संघामध्ये स्थान दिलं आहे. शार्दूल चांगली फलंदाजी करु शकतो असं ते म्हणालेत. गावस्कर यांनी युजवेंद्र चहलचाही संघात समावेश केलाय. श्रेयस अय्यर आणि राहुल चाहरला राखीव खेळाडू म्हणून ठेवावं असं म्हटलं आहे. गावस्कर यांनी आपल्या संघात स्थान न दिलेल्या खेळाडूंमध्ये शिखर धवन, पृथ्वी शॉ, ईशान किशन, मोहम्मग सिराज, कुलदीप यादव यांचा समावेश आहे.

नक्की पाहा >> एक विजय अन् पाच विक्रम… विराट ‘सर्वश्रेष्ठ’ कर्णधार; रिकी पाँण्टींगला मागे टाकत केला ‘हा’ विश्वविक्रम

गावस्कर यांनी निवडलेला संघ

फलंदाज: रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव

विकेटकीपर: के. एल. राहुल, ऋषभ पंत

ऑल राउंडर: हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, क्रुणाल पंड्या, वाशिंगटन सुंदर

तेज गेंदबाज: जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर

स्पिनर: युजवेंद्र चहल

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Icc t20 world cup 2021 sunil gavaskar selects his team no place for shikhar dhawan shreyas iyer scsg

ताज्या बातम्या