T20 World Cup Super 8 Scenario: टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सध्या निर्णायक वळणावर आहे. या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग घेतला आहे. या २० संघांना ४ गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेतही नवख्या संघांकडून मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ स्पर्धेूतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. तर झिम्बाब्वेकडे सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. २० पैकी ५ संघांनी सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर ५ संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. तर १० संघांना अजूनही सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.
कोणत्या ग्रुपमधील किती संघांनी सुपर ८ मध्ये प्रवेश केला?
ग्रुप ए- १
ग्रुप बी- १
ग्रुप सी- २
ग्रुप डी-१
ग्रुप ए
ग्रुप ए मधून भारतीय संघाने ३ पैकी ३ सामने जिंकून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तान या ३ संघांना पराभूत करून सुपर ८ फेरीत स्थान मिळवलं आहे. या गटात अमेरिका आणि पाकिस्तानकडे सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. पाकिस्तानचा शेवटचा सामना नामिबियाविरूद्ध होणार आहे. हा सामना जिंकून पाकिस्तानचा संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करू शकतो. पण जर पाकिस्तानने हा सामना गमावला. तर नेट रनरेटच्या आधारे अमेरिकेचा संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करू शकतो.
ग्रुप बी
रविवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवला. यासह ग्रुप बी मधून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियावर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं सकंट ओढावलं आहे. या गटातून झिम्बाब्वेला सुपर ८ फेरीत स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. जर झिम्बाब्वेने २ पैकी एकही सामना जिंकला, तर झिम्बाब्वेचा संघ सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरेल. पण जर झिम्बाब्वेने दोन्ही सामने गमावले, तर ऑस्ट्रेलियासाठी सुपर ८ फेरीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तसेच आयर्लंडचा संघ देखील शर्यतीत आहे. जर आयर्लंडने झिम्बाब्वेवर मोठा विजय मिळवला, तर आयर्लंडचा संघ देखील सुपर ८ फेरीत प्रवेश करू शकतो.
ग्रुप सी-
इंग्लंडला इटलीकडून मोठा धक्का बसणार होता. पण इंग्लंडने शेवटी पुनरागमन करून २४ धावांनी विजय मिळवला.यासह स्पर्धेतील तिसरा विजय मिळवून सुपर ८ फेरीत प्रवेश केला आहे. तर वेस्ट इंडिजने ३ पैकी ३ सामने जिंकून आधीच सुपर ८ फेरीत आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यामुळे ग्रुप सीचं समीकरण स्पष्ट झालं आहे.
ग्रुप डी-
ग्रुप डी मधून दक्षिण आफ्रिकेने सुपर ८ फेरीत प्रवेश केला आहे. आता न्यूझीलंड आणि कॅनडा यांच्यात होणाऱ्या सामन्यात जर कॅनडाने विजय मिळवला. तर न्यूझीलंडचा संघ सुपर ८ फेरीत प्रवेश करेल. पण जर कॅनडाने हा सामना जिंकला, तर अफगाणिस्तानकडे सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. त्यासाठी अफगाणिस्तानला कॅनडाविरूद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणं गरजेचं असणार आहे.

