India vs South Africa Warm Up Match : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना ७ फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्याआधी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय खेळाडू सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली आहे. हा सामना भारतीय संघाने ३० धावांनी आपल्या नावावर केला.
हा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडला. या मैदानात सामना कुठलाही असो, प्रेक्षक तुफान गर्दी करतात. या सामन्यातही असच काहीसं चित्र पाहायला मिळालं. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी या सामना पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. भारतीय खेळाडूंनीही क्रिकेट चाहत्यांना नाराज केलं नाही. सर्व फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करून धावांचा डोंगर उभारला.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात संजू सॅमसनला स्थान दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे इशान किशनला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. डावाची सुरुवात करताना इशान किशनने २० चेंडूत ५३ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने २४ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने ४५ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने ३० धावा केल्या. अक्षर पटेलने नाबाद ३५ धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने १६ आणि हार्दिक पांड्याने ३० धावांची खेळी केली.
भारतीय संघाने २० षटकांअखेर ६ गडी बाद २४० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार एडन मारक्रमने ३८ धावांची खेळी केली. तर रायन रिकल्टनने ४४ धावा केल्या. शेवटी जेसन स्मिथने ३५ धावांची खेळी केली. तर ट्रिस्टन स्टब्सने नाबाद ४५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला २० षटकांअखेर ७ गडी बाद २१० धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना भारतीय संघाने ३० धावांनी आपल्या नावावर केला.

